शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कानउघाडणी

शिवसंपर्क अभियानाचा यज्ञ आरंभून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांत जाण्याचे आदेश दिल्यानंतरही तेथे जाण्याचे टाळणाऱ्या ४० पैकी २७ आमदार आणि काही संपर्कप्रमुखांची शुक्रवारी शिवसेना भवनात बोलावून दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरडपट्टी काढली.

एकेकाळी शिवसेनेच्या बांधणीसाठी मराठवाडा, विदर्भ पिंजून काढणाऱ्या आताच्या एका मंत्र्यानेही दांडीबहाद्दर आमदारांना कानपिचक्या दिल्या. या खरडपट्टीनंतर आमदारांची धावपळ उडाली आणि त्यांनी नेमून दिलेल्या मतदारसंघात पोहोचण्याची धावपळ उडाली. काही आमदारांनी संबंधित मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली व्यवस्था करण्याचे फर्मान सोडले.

शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून त्यांना विधानसभेमध्ये वाचा फोडता यावी म्हणून विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये संपर्क अभियानाचा यज्ञ शिवसेनेने आरंभला होता. ६ आणि ७ मे रोजी मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघात आमदारांना जाण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पण ४० पैकी २७ आमदार तेथे गेलेच नाहीत. अनुपस्थित राहिल्याबद्दल खुलासा करण्याचे आदेश या आमदारांना देण्यात आले होते. पण २७ पैकी काही जणांनी खुलासा देणेही टाळले.

याबाबत १२ मेच्या ‘लोकसत्ता’मध्ये सेनेच्या मनसुब्यांना आमदारांचा सुरुंग’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दांडीबहाद्दर आमदारांचे धाबेच दणाणले. या आमदारांना शुक्रवारी शिवसेना भवनामध्ये हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

शनिवार, १३ मे आणि रविवार, १५ मे रोजी विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही मतदारसंघांमध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी आमदारांना तेथील मतदारसंघात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या शनिवारप्रमाणे यावेळी शिवसंपर्क अभियानास आमदारांनी दांडी मारू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची कानउघाडणी केली.

शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी शनिवार, रविवार होणाऱ्या दौऱ्यात असा प्रकार होता कामा नये, असा सज्जड दम उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे मतदारसंघांची जबाबदारी सोपविलेल्या आमदारांची पळापळ सुरू झाली. यावेळीही दांडी मारण्याच्या बेतात असलेल्या आमदारांनी नेमून दिलेल्या मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. तेथे आपली व्यवस्था करण्याचे फर्मान आमदार मंडळींनी पदाधिकाऱ्यांना सोडले आणि सायंकाळच्या सुमारास आमदारांनी मुंबई सोडली.