मित्रालाही हरविण्याची जिद्द ठेवा; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना कानमंत्र!

मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढून भाजपला पराभूत करण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना युतीसाठी कोणत्याही तडजोडी व आर्जवे भाजपला करणार नसून भाजपने सन्मानजनक प्रस्ताव दिला, तरच चर्चेची तयारी शिवसेनेने ठेवली आहे. मात्र ताकद दाखविण्यासाठी आणि भाजपकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचा वचपा काढण्यासाठी या निवडणुका स्वबळावर लढविण्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कल असल्याचे समजते. युतीचा निर्णय शिवसेना स्थानिक पातळीवर घेणार नसून ठाकरे हेच घेणार आहेत. स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, अशा सूचनाच ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या नेत्यांना दिल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांनी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रतोदांची बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलाविली होती. यावेळी ठाकरे यांनी नेत्यांची मते जाणून घेतली. भाजपने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना संपविण्याचा प्रयत्न केला. पण ते पुरून उरले. तामिळनाडूत जयललिता तुरुंगात जाऊन आल्या, सध्या त्या आजारी आहेत, तरी त्यांच्या पक्षात एकजूट आहे. बिहारमध्ये लालूंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तरी जनतेने त्यांना निवडून दिले. मग आपणही काही कमी नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवून मित्रालाही हरविण्याची जिद्द ठेवावी, अशी भूमिका ठाकरे यांनी नेत्यांसमोर मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली असल्याने त्यांच्याकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल. युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नाही. युतीच्या चर्चेसाठी भाजपने नेत्यांची नियुक्ती करावी व त्यांनी शिवसेनेशी बोलावे, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. निवडणुका स्वबळावर लढल्यास त्याचा फटका भाजपला बसण्याची भीती असल्याने त्यांच्याकडूनच युतीचा प्रस्ताव येईल, असे शिवसेनेला अपेक्षित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

‘..तर युती करू नका

नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय जिल्हा पातळीवरच घ्यावा. शक्य होतच नसेल, तर युती करू नका. शिवसेनेला पराभूत करण्याचे नव्हे, तर भाजपला निवडून आणण्याचे आपले लक्ष्य आहे. मर्जीतील उमेदवार लादू नका. एकदिलाने काम करा. जो निवडून येऊ शकेल, त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे.  दलित आणि मुस्लिमांनीही भाजपला सहकार्य केले आहे. त्यांना सोबत घ्या. देवेंद्र फडणवीस</strong>

शिवसेनेने वातावरण गढूळ करू नये

युतीसंदर्भात भाजपची भूमिका अनुकूल असताना शिवसेनेने यावर टीकाटिप्पणी करून वातावरण गढूळ करू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, शिवसेनेने जाहीर भाषणातून भाजपवर टीका करणे टाळले पाहिजे आणि ते दोन्ही पक्षांसाठी योग्य नाही.  मुंबईत युती व्हावी, ही भाजपची इच्छा आहे.  – सुधीर मुनगंटीवार