उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान; डोसेवाल्यांपेक्षा भेंडी बाजारात छापे घालण्याची हिंमत सरकार दाखवणार का?

विधानसभेच्या वेळी आम्ही थोडे गाफील राहिलो. पंचवीस र्वष ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी पाठीत वार केले. महापालिकेसाठी युती करू वा ना करू, कदाचित स्वबळावरही लढू, पण युती तोडायची असेल तर पाठीत वार करू नका, हिंमत असेल तर समोर या. आम्ही आमचा सर्जिकल स्ट्राईक दाखवून देऊ , पण तुमचा नेता कोण ते ठरवा, अंगावर कुणी यायचं तेही ठरवा, ही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेतील सहभागी असलेल्या भाजपला थेट आव्हान दिले.

शिवाजी पार्क मैदानावरील विराट सुवर्ण महोत्सवी मेळाव्यात आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर अभिनंदन केले, पण जनतेच्या हिताविरोधात सरकार जात असेल तर शिवसेना विरोधही करेल असा इशाराही  दिला. केवळ पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक करून थांबू नका, यापुढे अशी कारवाई करा, की पाकिस्तानची ओळख पुसली जाऊन हिंदुस्तान अशी होईल, असेही ठाकरे म्हणाले.

सुरुवातीलाच काहीसे भावुक होऊन उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, पन्नास वर्षांची मेळाव्याची परंपरा यापुढेही कित्येक वर्षे शिवतीर्थावर अशीच चालू राहील. पहिल्या मेळाव्यातही हेच मैदान तुडुंब भरलेलं होतं. तेव्हा माँच्या मांडीवर बसून मी भाषणं ऐकत होतो. पक्षाच्या स्थापनेचा नारळ वाढवला गेला, तेव्हा त्याचे जे पाण्याचे थेंब अंगावर उडाले, ते थेंब मला एवढं चिंब भिजवून टाकतील हे तेव्हा मनातही नव्हतं. शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या रूपाने हे मौल्यवान सोनं मला दिलंय.  दोन वर्षांपूर्वी आपण एकाकी लढलो समोरच्या महारथींचा अश्वमेध शिवसैनिकांनी रोखला. उद्याचं यशही मी तुमच्या चरणी वाहून टाकलंय, अशी ग्वाही त्यांनी दिली, तेव्हा मैदान टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेले. आमच्यासोबत आलात, तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असे आव्हानही त्यांनी भाजपचा उल्लेख न करता दिले. पालिकेवर फडकणारा मराठी माणसाचा भगव्याला हात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना  बळ दाखवून देऊ असे ते म्हणाले.

शिवतीर्थ हे दसरा मेळाव्याचे व्यासपीठ आहे. ते केवळ शिवसेनाप्रमुखांनाच शोधून दिसतं. हे मैदान आणि ते गाजविणारा नेता हे एकाच वर्षी, १९२७ साली जन्माला आले, हा योगायोग नाही. तो एक इतिहास आहे. दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन आपण करतोच, पण खरा, अनेक समस्यांचं दहन करणारा माझ्या देशात खराखुरा राम जन्मणार की नाही, हा प्रश्न अजूनही कायमच आहे. बऱ्याच वर्षांनंतर का होईना, आपल्या फौजेने आणि आपल्या सरकारनेही, पाकिस्तानी सेनेला ठोकलं, म्हणून मी सैन्याचं आणि पंतप्रधानांचे जाहीर अभिनंदन करतो.

काळ्या पैशासाठी आयकर खात्याने सुरू केलेल्या धाडसत्राबाबत बोलताना, भेंडीबाजारसारख्या भागातही धाडी टाकल्या पाहिजेत, असे ठाकरे म्हणाले.उद्या महापालिकेसाठीही कुणाला खुमखुमी असेल, तर त्यांनी आमच्या अंगावर यावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

  • भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर त्याबद्दल शंका घेणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. या हल्ल्यानंतर काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी ‘रक्ताची दलाली’ असा शब्द वापरला. त्यांना तो बोफर्सच्या दलालीतून सुचला असवा.
  • लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. आता ‘अच्छे दिन’ची हड्डी गळ्यात अडकल्याचे सांगता मग हड्डी काढणार कोणा? आसाम वगळता देशात सर्व राज्यांमधील निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षच विजयी झाले असून एकाच वेळी निवडणूका घ्या. यापुढे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी राजकीय व्यसपीठावर भाषण करू नये कारण ते देशाचे व राज्याचे प्रमुख असतात
  • महाराष्ट्र घडतोय’ अशा जाहिराती करता. प्रत्यक्षात महाराष्ट्र घडतोय का बिघडतोय असा प्रश्न आहे. चहावाल्याच्या राज्यात डोसेवाल्यांचा धाडी पडतात. भेंडीबाजारमध्ये या धाडी घालण्याची हिम्मत का दाखवत नाही.
  • केंद्रातील सध्याचे सरकार हे शेवटची आशा आहे. ते यशस्वी व्हावे अशी शिवसेनेची इच्छा आहे अन्यथा देशात अराजक माजेल.
  • मुंबई शिवसेनेची व शिवसेना मुंबईची हे कायम लक्षात ठेवा. महापालिकेवर भगवाच फडकेल.

आर्थिक निकषावर आरक्षण हवे

जातीपातीच्या मुद्दय़ावर आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण हवे, ही शिवसेनेची पूर्वीपासूनचीच भूमिका आहे, याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला. आर्थिक पेचप्रसंग असले, की कुटुंबांना काय सोसावे लागते, हे आम्ही कुटुंबीयांनी सोसले आहे, असेही ते म्हणाले. त्याच वेळी बाळासाहेबांचे ऐकून आर्थिक निकषांवर न्याय्य हक्क दिले असते, तर आज मराठय़ांवर मोर्चे काढण्याची वेळ आली नसती, या उद्रेकात शिवसेना त्यांच्यासोबत आहे, कारण न्याय्य हक्कांपासून कुणालाच वंचित ठेवता येणार नाही, मात्र, अन्य कुणाच्याही न्याय्य हक्कांना कणभरही धक्का लागता कामा नये, असे ठाकरे म्हणाले.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यचा गैरवापर होत असेल तर तो करणाऱ्यांना शिक्षा द्या, व गरज असेल तर त्यात दुरुस्ती करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या. गोरगरिबांना शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यासाठी शैक्षणिक सवलतीची मर्यादा पाच लाखांपर्यंत करावी यासाठी शिवसेना सरकारवर दबाव आणेल.   -उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख