पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा; नगरसेवकांच्या भावना समजावून घ्या

नवी मुंबई महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता इरेला पेटले आहेत. लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करायचा नसल्यास अविश्वास ठरावाचा अधिकारच काढून घेवून कायदाच रद्द करावा, असा सणसणीत टोला ठाकरे यांनी लगावला आहे. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याने आता मुख्यमंत्र्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.

मुंढे यांच्या बदलीसाठी भाजप वगळता सर्वपक्षीय नेते एकवटले असून महापौर सुधाकर सोनावणे यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेने अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी करुनही त्याला धूप न घालता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंढे यांच्या पाठीशी राहण्याची ठाम भूमिका घेतली. मुख्यमंत्री शिवसेनेला फारशी किंमत देत नसल्याने शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्यासह काही नेत्यांनी ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी धाव घेऊन मुंढे यांच्या बदलीबाबत चर्चा केली. त्यानंतर ठाकरे यांनी मुंढे यांच्या बदलीवर शिवसेना ठाम असल्याची भूमिका मांडत लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करावा, असे स्पष्ट केले. सर्वपक्षीय नेते जनहितासाठी एकत्र आले आहेत. पक्षभेद विसरून सर्वानी मुंढे यांच्याविरोधात मतदान केल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांशी चर्चा करुन त्यांची भूमिका समजून घ्यावी, असे सांगून ठाकरे यांनी सरकार जनतेच्या भावनांचा आदर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करायचा नसल्यास ते कायदे रद्द करुन मुख्यमंत्री म्हणतील त्याप्रमाणे कारभार चालवावा, असा टोला लगावत ठाकरे यांनी जर कायद्यात तरतूद असेल, तर त्याचे पालन करण्यात यावे, असे स्पष्ट केले.