19 September 2020

News Flash

..तर सेना जीएसटी विरोधात?

केंद्र व राज्य सरकारपुढे लाचारी नाही; भाजपची कोंडी करण्याची खेळी

uddhav thackeray : भाजपकडे मध्यावधी निवडणुकांसाठी एवढाच पैसा असेल तर तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यावा. त्या मोबदल्यात शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल.

केंद्र व राज्य सरकारपुढे लाचारी नाही; भाजपची कोंडी करण्याची खेळी

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात रोखून भाजपची कोंडी करण्याची राजकीय खेळी  करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. जीएसटीमुळे जकात रद्द होणार असून नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या निधीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे लाचारी करणार नाही, असे ठणकावत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेची स्वायतत्ता गमवावी लागणार असेल तर विचार करावा लागेल, असा इशारा भाजपला दिला आहे. मात्र जीएसटी विधेयक राज्य विधिमंडळात कोणताही अडथळा न येता मंजूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक शिवसेनाभवनात घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जीएसटीबाबत आपली भूमिका मांडली. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन २० मेपासून सुरु होत असून त्याबाबत ठाकरे यांनी आमदारांना सूचना दिल्या. महापालिकेचे जकातीचे उत्पन्न सुमारे सात हजार कोटी रुपये असून जीेएसटीनंतर ते बंद होईल. जीएसटीची नुकसानभरपाई मुंबई महापालिकेला थेट देण्यात यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण सर्व राज्यांमधील महापालिकांना केंद्र सरकारकडून राज्य सरकारमार्फतच भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा अपवाद करण्याची केंद्र सरकारची तयारी नाही. महापालिकेला थेट भरपाईची रक्कम मिळावी, ही मागणी शिवसेनेच्या खासदारांनीही अर्थमंत्री अरुण जेटलींकडे केली होती. पण ती मान्य झालेली नाही.

शिवसेनेची मदत मिळाल्याखेरीज या विधेयकांना मंजुरी मिळणे कठीण आहे. केंद्राकडून भरपाईची रक्कम मिळण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून ती महापालिकेला कधी वर्ग करायची, याचे नियंत्रण राज्य सरकारकडे राहणार आहे. ही रक्कम अन्यत्र न वळविता किंवा दर महिन्याला ठराविक तारखेच्या आता महापालिकेकडे वर्ग झाली पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी आहे. महापालिकेची आर्थिक स्वायतत्ता धोक्यात येणार असल्यास या विधेयकाबाबत विचार करावा लागेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

महापालिकेला नियमित निधी उपलब्ध न झाल्यास त्याचा फटका विकास कामांना बसणार आहे. त्यामुळे शिवसेनेने जीएसटीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र संसदेने या कायद्याला मंजुरी दिल्याने शिवसेनेच्या विरोधाला काडीचीही किंमत नसून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मुंबई महापालिकेसाठी कोणताही अपवाद करणे केंद्राला शक्य नसल्याने महापालिकेला राज्य सरकारकडूनच भरपाईचा निधी स्वीकारावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निवडणुकीच्या तयारीला लागा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार निरुपयोगी आहे, असे टीकास्त्र सोडत शिवसेनेची कधीही निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी असल्याचे सांगणाऱ्या ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षाच्या आमदारांना दिल्या आहेत. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसंपर्क अभियान आणि अन्य बाबींवर चर्चा केली. हे अभियान सहा व सात मे रोजी मराठवाडय़ापासून सुरु होत असून विभागवार टप्प्याटप्प्याने सभा, मेळावे, बैठका होतील. शेतकरी कर्जमाफी व अन्य प्रश्नांचा आढावा घेतला जाईल. कर्जमुक्तीच्या मुद्दय़ावर वातावरण तापविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 2:16 am

Web Title: uddhav thackeray comments on gst
Next Stories
1 बेस्टला पाच टक्के व्याजदरासाठी स्थायी ठाम
2 क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्राणी-पक्ष्यांची विक्री सुरूच
3 वज्रेश्वरीतील प्राणी निवारा संस्थेत प्राण्यांची हेळसांड
Just Now!
X