गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकांमधला पराभव हा भाजपाच्या अहंकाराचा आणि उन्मत्तपणाचा पराभव आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामना या शिवसेनच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत मित्रांना दूर लोटले व खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटेच येतात असे भाजपाला सुनावले आहे.

नेमके काय आहे अग्रलेखात?
त्रिपुरा या छोटय़ा राज्यात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या विजयोन्मादाचा उत्सव सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघांचे निकाल लागले आहेत व त्रिपुरा विजयाचे लाडू भसकन तोंडाबाहेर पडले आहेत. भाजपाच्या तंबूत घबराट पसरवणारे हे निकाल आहेत. गोरखपूर व फुलपूर हे भाजपाचे दोन मजबूत किल्ले समाजवादी पार्टीने उद्ध्वस्त केले आहेत. पोटनिवडणुका म्हणजे देशाची भावना नाही असे भाजपातर्फे सांगितले जाते; पण मोदी हे सत्तेवर आल्यापासून १० लोकसभा पोटनिवडणुका झाल्या व त्यातील ९ जागांवर भाजपाचा पराभव झाला. लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार होते. हा आकडा आता २७२ पर्यंत घसरला आहे. भाजपा मोदी व शहा यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सर्व पोटनिवडणुका हरला आहे.

राजस्थानातील पोटनिवडणुका काँग्रेसने जिंकल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसने आता फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात. हे विधान बरोबर नाही. गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने अहंकार व उन्मत्तपणाचा पराभव केला आहे. मित्रांना दूर लोटले व खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात. काँग्रेसचे तेच झाले होते. कोसळणे सुरू होते तेव्हा कोणतेही चाणक्य पडझड रोखू शकत नाहीत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही भाजपाच्या अंताची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामालाच ते ठाऊक; पण जनतेने उचलून आपटले हे मात्र मान्य करावे लागेल.