शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार म्हणजे ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ या म्हणीची आठवण करून देणारे आहे.  गेल्या तीन वर्षातील भांडणे पाहता सहजपणे दिसून येते. एकमेकांवर चिखलफेक करण्याची किंवा आरोपांच्या फैरी झाडण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. आता आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर अशाच प्रकारे शेलक्या शब्दांत ताशेरे झाडण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली उरलेली वर्षे डोलण्यात जातील अशी उपरोधिक टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांच्या बोलघेवडेपणावर आजच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे आणि हाच धागा पकडत भाजपला लक्ष्यही करण्यात आले आहे. एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या तिघांनीही मागील चार दिवसात विनोदी वक्तव्ये करून लोकांचे मनोरंजन केले आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

‘बाबांनो तुमचे तुम्ही बघा सरकारच्या भरवशावर राहू नका’; असा सल्ला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तर, ‘मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसेच देत नाहीत मी काय करू?’ असे वक्तव्य करून बबनराव लोणीकरांनीही हतबलता व्यक्त केली आहे. तर गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून काही दिवसांपूर्वीच असे म्हटले की, ‘काय मागायचे ते आत्ताच मागा, नंतरचा काही भरवसा नाही.’ या तिन्ही नेत्यांच्या वक्तव्याची खिल्ली सामनाच्या अग्रलेखात उडवण्यात आली आहे.

शेलक्या शब्दात टीका
महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली डोलण्यात जातील. महाराष्ट्राला आणि जनतेला बुलेट ट्रेनशिवाय काय मिळाले? गतिमान आणि अतिवेगवान ट्रेन देण्याचा धडाका सरकारने लावला आहे. मात्र लोकांना जो कामातला धडाका हवा आहे तो मात्र कुठेच दिसत नाही. बुलेट ट्रेननंतर आता २२ हजार कोटींच्या मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे ची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. हे सगळे करण्यासाठी पैसे आहेत का? असा प्रश्न लोणीकरांना नक्कीच पडला असेल. अशा शब्दात टीका करून भाजपवर शिवसेनेने शरसंधान केले आहे. आता शिवसेनेच्या या टीकेला भाजप उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.