महाराष्ट्राच्या मंत्रालयात धर्मा पाटील हे ८४ वर्षांचे शेतकरी आत्महत्या करतात. तर भाजपाप्रणित सरकार काश्मीरमध्ये अतिरेक्यांना मारल्याने लष्करावर गुन्हे दाखल करते. आपल्याच सरकारविरोधात आकांडतांडव करण्याचे नाटकही रचते. हे ढोंग करण्यापेक्षा भाजपा सत्तेतून बाहेर का पडत नाही? असा प्रश्न शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधत जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर का पडत नाही? असा प्रश्न विचारला आहे आणि भाजपवर टीका केली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

मेहबुबा मुफ्तींच्या सरकारमध्ये भाजपा सहभागी आहे. अशात मेहबुबा आणि त्या मंडळींनी केंद्र सरकारविरोधात मस्ती सुरु केली आहे. शोपियान जिल्ह्यातील हल्ला प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरण आहे. गस्त घालण्यासाठी निघालेल्या लष्कराच्या ताफ्यावर तीन दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला. प्रचंड दगडफेक झाली. लष्करी तुकडीचे नेतृत्त्व करणाऱ्या मेजर आणि सात जवानांना ठार मारण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे लष्कराला स्वरक्षणासाठी गोळ्या झाडाव्या लागल्या. या गोळीबारात दोन दगडफेक्यांचा मृत्यू झाला.

संपूर्ण प्रकरणात लष्करावर ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधित मेजर आणि त्यांच्या गस्ती पथकांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश मेहबुबा मुफ्ती यांनी दिले आहेत. या प्रश्नी भाजपाने मौनव्रत टाळले पाहिजे अन्यथा मोठ्या उद्रेकास तोंड द्यावे लागेल अशी भीती भाजपाला वाटत असावी. या प्रश्नी भाजपाने विधानसभेत हंगामा केला. मेहबुबा सरकारमध्ये ही मंडळी आहेत उपमुख्यमंत्रीपद आणि अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा असा सल्लाही अग्रलेखात देण्यात आला आहे.

जमत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा असा सल्ला आम्हाला कायम महाराष्ट्रात दिला जातो. जम्मू काश्मीरचे काय? तिथे तर हे विचारण्याचीही सोय राहिलेली नाही. काश्मीरमधील पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी आपले लष्कर लढते आहे. लष्करावर दगडफेक करणाऱ्या माथेफिरूंना पाकिस्तानी संघटनांकडून पैसै वाटले जातात हे आता लपून राहिलेले नाही. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती युद्धासारखीच आहे आणि मेहबुबा सरकारची भूमिका नेहेमीच संशयास्पद राहिली आहे. श्रीनगरच्या लाल चौकात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवण्याची हिंमत मेहबुबा सरकारमध्ये नाही. अशा सरकारचे भागीदार म्हणून भाजपा बसले आहे. जय जवान, जय किसान या घोषणेच्या चिंधड्या उडाल्या आहेत असेही या अग्रलेखात म्हटले आहे.