News Flash

नीरव मोदीलाच रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा-उद्धव ठाकरेंचा टोला

भाजपाच्या आशीर्वादामुळेच नीरव मोदी देशाबाहेर

उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींना गंडा घातला. तसेच इतर १७ बँकांना सुमारे ३ हजार कोटींना गंडा घातला. या प्रकरणावरून विरोधक सरकारविरोधात बोलत असताना आता उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सामना या शिवसेनेच्या अग्रलेखातून नीरव मोदीला आता रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा असा खोचक सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा दाखला देत मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत.

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?

शे-पाचशे रुपये कर्जाचा हफ्ता फेडता येत नाही म्हणून राज्यात-देशात शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो पण देशातील बनेल उद्योगपतींनी बँकांची दीड लाख कोटींची लूट केली तरीही हे सगळे दरोडेखोर सुखरुप आहेत. देश सध्या जाहिरात बाजीवर चालला आहे. प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी यावर हजारो कोटींचा खर्च सुरु आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुराम राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या चेअरमनपदी नीरव मोदीलाच बसवा म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल.

हिंदुस्थानात विकासकामांसाठी पैशांची कमतरता नाही. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय कुटुंबासह पळून गेले. नीरव मोदीने जानेवारीतच देश सोडल्याचे समोर आले आहे. पण गेल्याच आठवड्यात हे महाशय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दावोसमध्ये मिरवत होते. मोदी आणि यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नीरव मोदी हा भाजपाचा हमसफर होता आणि निवडणुकांसाठी पैसे जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजपा नेत्यांच्या आशीर्वादाने केला आणि त्याने बँकांची लूट केली त्यातला वाटा भाजपाच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही. पण भाजपाची श्रीमंती वाढवण्यात आणि निवडणुकांसाठी पैशांचे डोंगर उभे करण्यासाठी असे अनेक नीरव मोदी झटत आहेत हे उघड आहे.

न खाऊंगा ना खाने दुंगा ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नीरव मोदी प्रकरणात अपयशी ठरली आहे. पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदीबाबत तक्रार केली होती. तरीही हा माणूस दावोसला गेलाच कसा? नीरव मोदीचे आधार कार्ड बँक खात्यास लिंक केले असते तर काही गोष्टी उघड झाल्या असत्या. सामान्य माणसाला आधार कार्डाशिवाय स्मशानात लाकडेही मिळत नाहीत, रुग्णालयात प्रवेशही मिळत नाही. पण नीरव मोदीने आधार कार्डाशिवाय ११ हजार कोटींची लूट केली. नीरव मोदी विदेशात पळून गेल्यावर ईडी वगैरेने धाडी घातल्या. १८ ठिकाणी धाडी घालून ५१०० कोटी रुपयांचे दागिने जप्त केले असे समजले. अशा मालमत्ता विजय मल्ल्या आणि ललित मोदीच्याही आहेत पण तेही पसार झालेच आहेत.

मुंबईत भुजबळ तुरुंगात आहेत आणि पाटण्यात लालूप्रसाद पण नीरव मोदींप्रमाणे कृपाशंकर यांचे भाग्य चमकले आहे. त्यामुळे भाजपाकृपेने ते सुखरुप सुटले आहेत. डी एस कुलकर्णींचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. पण सरकारच्या नाकासमोरून मल्ल्या आणि नीरव मोदी पळून गेले आहेत . २०१४ मध्ये भाजपाला निवडणुका जिंकून देण्यासाठी जे धनदांडगे उभे राहिले ते काय लायकीचे होते हे आता समोर आले आहे. भ्रष्टाचारमुक्त देश आणि पारदर्शक कारभार याची लक्तरे तीन वर्षात देशासमोर टांगली गेली आहेत. अशा भाषेत मोदी आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2018 9:38 am

Web Title: uddhav thackeray criticized narendra modi and bjp on nirav modi issue in saamna editorial
Next Stories
1 एकांत हा छळतो जिवां!
2 मानखुर्दमधील दीडशे गोदामे जमीनदोस्त
3 कारशेडसाठी आरेतील जागेचा अट्टहास का?
Just Now!
X