भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी शेतकरी मोर्चामागे माओवादी हात आहे का? याचा शोध घेतला पाहिजे असे वक्तव्य करत वाद ओढवून घेतला. हे आंदोलन त्यांनी थेट माओवादी अथवा नक्षली चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर गप्प बसेल ती शिवसेना कसली? शिवसेनेच्या अग्रलेखात अत्यंत खोचक शब्दांमध्ये पूनम महाजन यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.

हिंदुस्थानी लष्करावर चिखलफेक करणाऱ्या नरेश अग्रवलांना जो पक्ष पायघड्या घालतो त्या पक्षाला शेतकऱ्यांना माओवादी म्हणणे शोभत नाही असे म्हणत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात पूनम महाजन यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मोर्चात शहरी माओवाद घुसला असेल तर भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी अतिरेक्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत का? असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?
भाजपाच्या सुविद्य ‘प्रमोद’कन्या पूनम महाजन यांनी अचानक मुक्ताफळे उधळली आहेत. शेतकऱ्याने उत्तम पीक घ्यावे. शेती आणि मळा बहरून यावा आणि अचानक अवकाळी पाऊस, गारपिटीने सगळे काही उद्ध्वस्त व्हावे तसे काहीसे वक्तव्य पूनम महाजन यांनी केले आहे. मुंबईत धडक मारण्यासाठी आलेल्या शेतकरी मोर्चात शहरी माओवाद डोकावत असल्याचे वक्तव्य पूनमताईने केले आहे. पूनम महाजन या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी २०० किमीची पायपीट करीत शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला. शेतकऱ्यांचा हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध होता. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी मुंबईत दाखल झाले तरीही मुंबईकरांना या मोर्चाचा अजिबात त्रास झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्या मान्य करून टाळ्याही मिळवल्या.

मुख्यमंत्र्यांनी असे करणे म्हणजे माओवादास पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांनी अपराध केला असे पूनम महाजन यांना म्हणायचे आहे का? त्रिपुरात भाजपाने लालभाईंचा म्हणजेच कम्युनिस्ट विचारांचा पराभव केला. तो विचार लेनिक किंवा माओचाच होता. सत्ता स्थापन होताच लेनिनचे पुतळे उखडून फेकण्यात आले. पण त्याच लाल क्रांतीचा जयजयकार व लेनिन झिंदाबादच्या घोषणा देत ५० हजार शेतकरी नाशिकपासून मुंबईत चालत आले. त्यांच्या हातात लाल झेंडे व डोक्यावर लाल टोप्या होत्या. त्या लेनिनच्या लेकरांचे कौतुक भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी केल व सर्व मागण्याही मान्य केल्या. म्हणजे पुतळे उखडले तरीही विचार मरत नाहीत. माओवाद ही समस्या आहे व काही भागांत हाती बंदूक घेतलेले माओवादी हिंसाचाराचा उद्रेक करत असतात. कारण त्यांना त्यांचे हक्क नाकारले गेले.

शहरी माओवादाचा विचार पूनम महाजन पूनम महाजन यांनी मांडला. पण सोमवारच्या शेतकरी मोर्चाने कोणतीही देशद्रोही घोषणा केल्याची नोंद नाही. महाराष्ट्र, छत्तीसगढ, झारखंड, आंध्र, तेलंगण सारख्या राज्यांमध्ये माओवादी हाती बंदुका घेऊन लढत आहेत. हा माओवाद जितका खतरनाक आहेत त्यापेक्षा जास्त खतरनाक नरेश अग्रवालसारखे लोक आहेत. रामाची निंदा करणाऱ्या, हिंदुस्थानी सैन्यावर चिखल फेकणाऱ्या नरेश अग्रवालांना जो पक्ष पायघड्या घालतो त्या पक्षाला शेतकऱ्यांना माओवादी म्हणून हिणवणे शोभत नाही. शेतकऱ्यांच्या मोर्चात शहरी माओवाद घुसला असेल तर भाजप मुख्यमंत्र्यांनी अतिरेक्यांच्या मागण्या मान्य केल्या असे मानायचे काय? असा प्रश्न या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.