पीक विमा योजनेत ९० लाख शेतकरी अपात्र

पंतप्रधान पीक विमा योजनेत ५३ लाख शेतकरी पात्र तर सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. शिवसेनेमुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांची भरपाई मिळाली असली, तरी अजून दोन हजार कोटी रुपयांची भरपाई विमा कंपन्यांनी दिलेली नाही. ही भरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

विमा योजनेत आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पुन्हा विनंती करण्यात येईल, असे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही लाखो शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळालेली नाही. त्याविरुद्ध शिवसेनेने मोर्चा काढून विमा कंपन्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती. पण अजूनही लाखो शेतकरी भरपाईपासून वंचित असल्याने ठाकरे यांनी विमा कंपन्यांना पुन्हा इशारा दिला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन योजनेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. शिवसेनेमुळे १० लाख शेतकऱ्यांना मदत मिळाली असली तरी शेतकऱ्यांचे दोन हजार कोटी रुपये विमा कंपन्यांकडे आहेत. भरपाई मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. वाशिम जिल्ह्य़ातील शेतकरी सोनाली राठोड यांनी एक हजार ८०० रुपयांचा विमा काढला असताना त्यांना दोन एकर शेतीसाठी फक्त १०२ रुपये भरपाई मिळाली. या योजनेत गैरव्यवहार असून ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविताना कोणते निकष लावले, हे तपासण्याचीही गरज आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

सरकारने विमा कंपन्यांना नफा ठरवून द्यावा. शेतकऱ्यांना भरपाई देत नसल्याने विमा कंपन्यांवर सरकारने कारवाई करावी आणि कंपन्यांनी भरपाई न दिल्यास विमा कंपन्यांकडून निधी घेऊन सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.