देशाची मान जगभरात शिवसेनेच्या शाईफेक आंदोलनामुळे नव्हे तर दादरी प्रकरणामुळे खाली गेली, गाईवर नको महागाईवर बोला, राम मंदिर बनाएंगे लेकिन तारिख नही बताएंगे, असे एकामागोमाग एक वाग्बाण सोडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेना दसरा मेळाव्यात भाजपवर हल्ला चढविला. मात्र त्याचवेळी सत्तेमध्ये कायम राहू, असे सांगत सत्तेचे उल्लंघन करणार नसल्याचेही स्पष्ट केले.

शिवाजी पार्कवर झालेल्या पारंपरिक दसरा मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या काही दिवसांत भाजपबरोबर सुरू असलेल्या खणाखणीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्यात ठाकरे भाजपविरुद्ध ठोस पवित्रा घेणार का, याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. ठाकरे यांनी आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नावही न घेता भाजपवरच निशाणा साधला. ‘शिवसेनेत पूर्वीसारखा स्वाभिमान उरलेला नाही,’ या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचाही उद्धव यांनी समाचार घेतला. सोनिया गांधी यांची लाचारी करून ज्यांनी सत्ता मिळवली त्यांनी शिवसेनेला स्वाभिमान शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केंद्र व राज्य सरकारवर तसेच भाजपवर त्यांनी जोरदार हल्ला चढविला. शिवसेना हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा कधीही सोडणार नाही, असे ठणकावत भारत हे हिंदू राष्ट्र जाहीर करून सर्वाना समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी त्यांनी केली. प्रचंड बहुमताने सत्ता आली तरी राममंदिराबाबत ब्र ही न काढणाऱ्या भाजपची ‘मंदिर वही बनाऐंगे, मगर तारीख नही बताऐंगे’ अशी खिल्ली त्यांनी उडविली. आपल्या संपूर्ण भाषणात भाजपवर हल्ला चढवूनही शिवसेना सत्तेत मात्र सहभागी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे आणि किती दिवस सत्तेत रहायचे हे आम्हाला कळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रातील सरकार हे जनतेची शेवटची आशा असून ते अपयशी झाले, तर देशाचे काय होईल, हे माहीत नाही, असे सांगून महाराष्ट्र सांभाळण्यासाठी शिवसेना समर्थ असून विधिमंडळावर शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
हरियाणात दलितांना जाळल्याच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही, असे केंद्रातील मंत्री सांगतात. पण हे घडलेच कसे, असा सवाल उपस्थित करून केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी दलितांची कुत्र्यांशी बरोबरी केल्याबद्दल ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि हीच जर भाजपची भूमिका असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे थाटामाटात भूमीपूजन का केले, असा खरमरीत सवालही त्यांनी केला.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद मोहम्मद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी पोलीस संरक्षण दिल्याबद्दल ठाकरे यांच्यासह मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते शरद पोंक्षे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कार्यालयात घुसून केलेल्या आंदोलनाचेही त्यांनी समर्थन केले. राज्यात शिवसेना लहान भाऊ, मोठा भाऊ नव्हे, तर बापच आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी हाणला.
महागाईबद्दल लाज कशी वाटत नाही
ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच महागाईच्या मुद्दय़ावरुन करीत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली युती सरकार असताना पाच वर्षे पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते, मग ते आता का जमत नाही, असा सवाल करीत केंद्र व राज्य सरकारचे महागाईबद्दल वाभाडे काढले. विरोधी पक्षात असताना भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदीबरोबर महागाईविरोधात आपणच मोर्चे काढत होतो. महागाईवर नियंत्रण न ठेवणारे सरकार नालायक आहे, अशी टीका करीत होतो आणि आता हे काय चालले आहे, जनतेपुढे जायला लाज वाटते, अशा जळजळीत शब्दांत ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. विराट कोहलीचे शतक पहायचे की डाळीच्या दरांचे, अशी खिल्ली उडवत डाळीची चोरी होत असल्याच्या घटनांचा उल्लेख करून आधी डाळींना संरक्षण द्या आणि मग पाकिस्तानातून आलेल्यांना द्या, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

अमित शहांविरोधात घोषणाबाजी
एक दो एक दो, भाजप को फेक दो, अमित शहांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात येत होती. भाजपकडून अवमानास्पद वागणूक दिली जात असल्याने सत्ता फेकून द्या, असे मतही काही शिवसैनिक मांडत होते.

ठाकरे यांचे वाग्बाण
मुफ्ती मोहम्मद सईद चालत असतील, तर शिवसेनेचेही ऐका.
शिवसेनेला शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नको.
देवळात घंटा बडविणारे नाही, अतिरेक्यांना बडविणारे हिंदुत्व हवे.
दाभोळकर आणि पानसरेंच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशी द्या.
सर्वोच्च न्यायालयानेही दोषी ठरविलेल्या याकूब मेमनचा पुळका येतो, मग िहंदूंचा का येत नाही?
साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, समीर गायकवाड यांना खटला न चालविता तुरुंगात का सडविले जात आहे?
काश्मिरात पाकिस्तानचे झेंडे चालत असतील तर भगव्याला विसरू नका, नाहीतर तो तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे
गुलाम अली यांची गाणी मलाही आवडतात, पण पाकिस्तानने भारताची ईदची मिठाई नाकारली, हे का विसरता?
अब्दुल हमीद मुसलमान असला तरी आमचा बंधू. त्याच्या कबरीपुढे मी नतमस्तक होईन, पण औरंगजेबाच्या थडग्यापुढे नाही.