मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे येथील एच/पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या नूतन इमारतीचं आज (५ ऑगस्ट) उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “१ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून अर्थात गेले तीन महिने जी वास्तु वापरात आहे, त्या वास्तुचं उद्घाटन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फसगत व्हावी आणि कार्यक्रमाचे हसे व्हावे, अशा प्रकारे दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेनं का करुन दाखवले?”, असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

“या कार्यालयाचा ठराव मांडून त्यासाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर,प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत गेल्या सहा वर्षात 8 वेळा बैठका घेतल्या. या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टाहास कशाला?”, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला. “महापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करुन दाखवतील याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारतीबाबत वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली आहे”, अशी टीका शेलार यांनी केली.

“उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात जळगावला नियोजित कार्यक्रमात असताना काल रात्री दहा वाजता अचानक मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दूरध्वनीवरुन मिळाले. त्यामुळे कार्यक्रमाला पोहचणे शक्य झाले नाही. मुख्यमंत्री आमच्या विभागात येत असताना त्यांच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून गैरहजर असलो, तरी जनमाणसात योग्य संदेश जावा म्हणून मी स्थानिक नगरसेवका अलका केळकर यांच्या हातून पुष्पगुच्छ पाठवून त्यांचे स्वागत केले. पण हे मनाला न पटणारे आहे. मुंबई महापालिका श्रेय वादाच्या नादात हे असे जे काही करुन दाखवते आहे, त्याबद्दल खेद वाटतो आहे”, असं म्हणत शेलार यांनी नाराजी व्यक्त केली.

“मुख्यमंत्रीपदाचा सन्मान राखणं आपले कर्तव्य नाही का? केवळ करुन दाखवलेच्या नादात तीन महिने लोकसेवेत असलेल्या इमारतीचे लोकार्पण रातोरात ठरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणे योग्य आहे का? महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करुन दाखवलेच्या नादात उद्या अचानक गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करु नये म्हणजे मिळवले”, असा टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला.