जिकडे पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसत आहे, असे खरमरीत टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता सोडले आहे. केंद्रात व राज्यात भाजप मंत्र्यांवर आरोपसत्र सुरू असताना सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावरून भाजपवर पुन्हा तोंडसुख घेतल्याने खळबळ उडाली आहे.
केंद्रात सुषमा स्वराज, स्मृती इराणी आदींसह राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्यात विनोद तावडे, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांच्यावर वेगवेगळे आरोप झाल्याने निर्माण झालेले वाद अजून शमलेले नाहीत. त्यातच एनडीएमध्ये सामील असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अप्रत्यक्षपणे पुन्हा तोफ डागली आहे. मी जनतेला एकहाती सत्ता मागितली होती. पण पूर्ण सत्ता मिळाली नाही, म्हणून दिलेल्या वचनापासून मी पाठ फिरविली नाही. एक दिवस मराठी माणसाने ठरविले तर ते शिवसेनेला एकहाती सत्ताही देतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम पक्षाने हाती घेतले असून मराठी तरुणांना उद्योगांसाठी टेंपोचे वाटप ठाकरे यांच्या हस्ते काळाचौकी येथे करण्यात आले. त्या वेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता हल्ला चढविला. शिवसेना सत्तेसाठी कधीही काम करीत नाही. वडापावच्या गाडीवरून अनेकांनी शिवसेनेवर टीका केली. पण शिवसेनेने मराठी माणसाला स्वाभिमान दिला, एवढेच मी टीकाकारांना सांगेन, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढय़ातील लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांचा उल्लेख करून आजकालच्या राजकीय नेत्यांची लायकी नाही आणि ५० वर्षांनी इतिहासात नोंद करण्यासारखे आजचे नेते नाहीत, अशी खरमरीत टीका ठाकरे यांनी शनिवारीच केली होती. लगेच पुन्हा त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडल्याने दोन्ही पक्षांमधील धुसफुस आता पुन्हा जोरात सुरू झाल्याचे दिसून येत आहे.