संदीप आचार्य 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोग्य व औषधांचा चांगला अभ्यास आहे. जमिनींचा, साखरेचा आणि सातबाराच्या अभ्यासापेक्षा आरोग्याचा अभ्यास नक्कीच चांगला असून देशाच्या आरोग्य समस्यांचा विचार करता देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आधी आरोग्याचा अभ्यास केला पाहिजे, अशी भूमिका मांडताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या करोना लढाईचे खरे सेनापती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचे ठामपणे सांगितले.

“करोनाच्या लढाईत काही मुद्यांवर महाविकास आघाडीतील नेते तसेच प्रमुखांचेही त्यांनी ऐकले नाही व आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यातूनच मुंबईसह राज्यातील करोनाला नियंत्रणात ठेवणे शक्य झाल्या”ची ‘रोखठोक’ भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली.
महाराष्ट्रातील करोनाची लढाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, तसं पाहिले तर ठाकरे घराण्यातच आरोग्याचा अभ्यास दिसून येतो. “प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब तसेच श्रीकांत ठाकरे यांना आयुर्वेद व होमिओपॅथीची चांगली माहिती होती. बाळासाहेबांनी मला छोट्या मोठ्या आजारात अनेकदा औषध दिले आहे. महत्वाचे म्हणजे मला हृदयविकाराचा त्रास झाल्यावर माझ्या अँजिओप्लास्टीपासून उपचाराचे सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांनी घेतल्या”चे संजय राऊत म्हणाले.

देशात व महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण आढळू लागताच मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपचारांवर भर देण्यास सुरुवात केली तेव्हा प्रथम त्यांची भूमिका फारशी कोणी गांभीर्याने घेतली नव्हती, मात्र करोना वेगाने पसरू लागताच उद्धव यांची भूमिका सर्वांनीच स्वीकारली. करोनाच्या हल्ल्याचे गांभीर्य व तीव्रता लक्षात घेत त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. लॉकडाउनबाबत ते ठाम राहिले. याबाबत त्यांनी महा विकास आघाडीचे नेते व प्रमुखांचेही एेकले नाही. नेतृत्व कशाला म्हणतात ते दाखवून दिले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ काय म्हणतात यालाच प्राधान्य देत मुंबईसाठी ठोस उपाययोजना केल्या. जगातील कोणत्याही शहरापेक्षा मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. लोकसंख्या, झोपडपट्टी, आरोग्य व्यवस्था याचा विचार करता मुंबई वाचत नाही, असे मत अनेकांनी सुरुवातीला व्यक्त केले होते. जगभरातील तज्ज्ञांनी मुंबईतील करोना कसा नियंत्रणात येईल याबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु झोपडपट्टी, गरीब वस्ती तसेच करोना रोखण्यासाठी घ्यायची काळजी आणि उपचारांची व्याप्ती वाढवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील करोना आज नियंत्रणात आणला आहे.

रुग्णालयातील बेड, अतिदक्षता विभागासह आवश्यक ती आरोग्य यंत्रणा अत्यंत वेगाने उभारताना चाचण्यांची संख्या वाढवणे, संपर्कातील लोक शोधणे यावर भर दिला. यासाठी जवळपास रोज रात्री बारा वाजेपर्यंत उद्धव ठाकरे तज्ज्ञ डॉक्टर व प्रशासनातील उच्चपदस्थांबरोबर संवाद साधतात. सर्वात महत्वाचे म्हणजे करोनाची कोणतीही माहिती त्यांनी लपवून ठेवली नाही. संपूर्ण पारदर्शकता ठेवली. यातूनच आज जागतिक आरोग्य संघटनेस जगभरातून धारावीसह मुंबईतील करोना नियंत्रणाचे कौतुक केले जात आहे.

मुंबईजवळच्या ठाणे जिल्हा व पुण्यातील परिस्थिती तसेच ग्रामीण भागात आता करोना पसरत चालल्याकडे लक्ष वेधले असता आता ठाणे जिल्हा व पुण्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे राऊत म्हणाले. ठाणे महापालिका व कल्याण – डोंबिवली महापालिकेवर अनेक वर्ष सत्ता असूनही आरोग्याचे कोणतीच ठोस व्यवस्था नसल्याने हजारो करोना रुग्णांना त्याचा फटका बसल्याबाबत विचारले असताना आगामी काळात केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

केवळ राज्यातच नव्हे तर देशतच आरोग्यावर गेल्या सात दशकात एक दीड टक्क्यांपेक्षा जास्त खर्च कोणी केला नव्हता. हे चित्र बदलण्याचा उद्धव ठाकरे यांचा संकल्प आहे. यासाठी मुंबईत पाच हजार खाटांचे अत्याधुनिक साथरोग उपचार रुग्णालय, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साथरोग रुग्णालय, शंभर प्रयोगशाळा तसेच हाफकीन सारख्या संशोधन संस्थेचे बळकटीकरण अशा आरोग्याच्या अनेक योजना त्यांनी संकल्पित केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे आरोग्य यंत्रणेत पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. पुण्यात लॉकडाऊन रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. थोडा काळ लॉकडाऊन रद्द केला गेला आणि त्याचे परिणाम दिसताच मुख्यमंत्र्यांची भूमिका किती योग्य होती हे स्पष्ट झाले. त्यानंतर अजित पवार यांनीच पुण्यातही ‘मुंबई पॅटर्न’ राबवा अशी मागणी केली, यातच उद्धव ठाकरे यांचे करोनातील नेतृत्व स्पष्ट होते, असे संजय राऊत म्हणाले.

उपनगरीय रेल्वे सुरु न करण्याबाबतची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच आहे. ठाणे जिल्ह्यातील करोना आटोक्यात आल्यावरच याबाबत विचार करता येऊ शकतो. शाळा सुरु करण्याचा निर्णय असो की परीक्षांबातची भूमिका असो लाखो विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करूनच भूमिका घेतली जात आहे. यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तज्ज्ञ डॉक्टरांशी उद्धव ठाकरे यांनी अनेकदा चर्चा केली आहे. जगातील काही देशांनी शाळा सुरु करण्याचे प्रयोग केले मात्र शाळा सुरु करताच विद्यार्थ्यांना करोनाची लागण होऊ लागताच त्यांनीही शाळा बंद केल्या आहेत.
महाराष्ट्रातील करोना परिस्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्यास राज्यातील डॉक्टर सक्षम आहेत. प्रत्येक वेळी जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते याचा विचार करण्याची गरज नाही. आज अमेरिकने जागतिक आरोग्य संघटनेला लांब ठेवले आहे तर रशियाने ही लस बनवताना त्यांना विचारले नाही. आपल्याकडे डॉक्टरांबरोबरीने कंपाऊंडरही उत्तम काम करतात, असे संजय राऊत यांनी सांगितले. विरोधी पक्ष आज केवळ टिका करताना दिसतो. जगभरातून मुंबई, धारावीसह महाराष्ट्रात जे करोनात ‘पारदर्शक’ काम केले जात आहे ते काम विरोधी पक्षाला का दिसत नाही, असा सवालही त्यांनी केला.