महाराष्ट्रात भाजप-सेना सरकार सत्तेवर असताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वबळावर सरकार आणण्याची भूमिका मांडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहा यांच्या स्वबळाची खिल्ली उडवली. वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान आणि रमण सिंग यांच्याप्रमाणे स्वबळाची त्यांची अपेक्षा असावी असा टोला उद्धव यांनी हाणला. सीमेवर अशांतता असताना पाकिस्तानला धडा शिकविण्याऐवजी चर्चा कसली करता अशा शब्दात नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीविषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अन्य पक्षांबरोबर युतीचे सरकार स्थापन करण्यापेक्षा स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे आवाहन मुंबईभेटीदरम्यान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपने एकहाती सत्ता मिळवली पाहिजे अशी भूमिका मांडली. राज्यात भाजप-सेनेचे सरकार असून मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक हा दोन्ही पक्षांसाठी कळीचा मुद्दा आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्रपणे लढण्याची भूमिका मांडली तर अमित शहा यांनी स्वबळाची भाषा केली. या पाश्र्वभूमीवर मातोश्री येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी  शहा यांच्या स्वबळाची खिल्ली उडविली. राजस्थानात वसुंधरा राजे, मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगड येथे रमण सिंग ज्याप्रमाणे स्वबळावर सरकार चालवत आहेत तशा स्वबळाची शहा यांना अपेक्षा असावी असा टोला हाणला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या रशिया भेटीत दशहतवदाविरोधात एकत्र लढण्याच्या झालेल्या निर्णयावरही उद्धव यांनी नाराजी व्यक्त केली. खरेतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायला हवे. नरेंद्र मोदी यांच्यात धमक आहे आणि ते पाकिस्तानला धडा शिकवू शकतात असेही ते म्हणाले. सीमेवर अशांतता असताना पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज असून मोदी ते करू शकतात अशा उफहासात्मक शब्दात मोदी-शरीफ चर्चेची त्यांनी खिल्ली उडविली.