12 July 2020

News Flash

एक रुपयात आरोग्य तपासणी, दहा रुपयांत जेवण!

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची आश्वासनांची खैरात

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची आश्वासनांची खैरात

मुंबई : हिंदुत्वासाठी भाजपशी युती केल्याचे स्पष्टीकरण देत पुन्हा सरकार आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, दहा रुपयांत जेवणाची थाळी आणि एक रुपयात आरोग्य तपासणीची सुविधा, अशी आश्वासनांची खरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात केली.

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी पार पडला. निवडणूक प्रचारात उमेदवार मग्न असल्याने गर्दी होण्यास बराच वेळ लागला. तरीही शिवाजी पार्कचा एक मोठा कोपरा रिकामाच राहिला. राज्यात पुन्हा शिवसेनेला सत्ता हवीच आहे, असे ठासून सांगत कुचराई करू नका, प्रामाणिकपणे काम करून विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

अनुच्छेद ३७० रद्द व्हावा, अयोध्येत राममंदिर उभारावे, समान नागरी कायदा व्हावा ही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे त्यानुसार वागत आहेत. त्यामुळेच भाजपशी युती केली, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती देऊन त्यांचा सातबारा कोरा करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तीनशे युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी वीजदरात ३० टक्के कपात करू, सर्वसामान्यांना दहा रुपयांत जेवणाचे ताट देऊ, एक रुपयात आरोग्य चाचणीची सोय करू, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा देऊ  आणि युवाशक्तीला काम देऊ , अशी आश्वासने उद्धव ठाकरे यांनी या वेळी  दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, राममंदिराचा विषय न्यायालयात असल्याने त्यावर जास्त बोलू नका. पण राममंदिरासाठी विशेष कायदा करून राममंदिर उभारावे, यावर शिवसेना ठाम असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

भाजपने विश्वासघात केल्याची भावना रासपचे महादेव जानकर यांनी व्यक्त केल्याचा संदर्भ देत प्रेमाने आलिंगन दिल्यानंतर पाठीवर वार करणाऱ्यांचा कोथळा काढण्याची शिवसेनेची ताकद असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपला दिला. तसेच डोक्यात सत्ता घुसली तर रस्त्यावरचे कुत्रेही विचारणार नाही. आपण शून्य असतो. जनतेपुढे नम्र राहायला हवे. उतू नका, मातू नका, असा सूचक संदेशही त्यांनी दिला.

मगरीचे अश्रू, असे ऐकले होते. आता अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू पाहिले, अशी खिल्ली ठाकरे यांनी उडवली. शेती करणार असे अजित पवार  म्हणाले, पण धरणात पाणीच नसेल तेव्हा काय, असा खोचक सवालही त्यांनी केला.

* राज्यात उद्योगात स्थानिकांना रोजगारात ८० टक्के प्राधान्य देण्याची तरतूद शिवसेनेमुळे झाली.

* आता कंत्राटी कामगार नेमतानाही स्थानिकांना प्राधान्य देणे बंधनकारक करणारा कायदा करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले.

* हीच ती वेळ, हाच तो क्षण, विकासासाठी तन मन धन.. या शिवसेना गीताचे अनावरण या वेळी करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 4:25 am

Web Title: uddhav thackeray make big promises in dussera rally at mumbai zws 70
टॅग Dussehra
Next Stories
1 आचारसंहिता कालावधीत राज्यात ४७७ गुन्हे दाखल
2 ‘रॅनिटिडिन’ची चाचणी केंद्रीय औषध नियंत्रक विभागाकडेच नाही
3 जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात रहिवाशांऐवजी विकासकांनाच लाभ!
Just Now!
X