News Flash

बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी, आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? – उद्धव ठाकरे

हिंदुत्वाच्या अंगावर चाल करून येणाऱ्यांवर बाळासाहेब तुटून पडले. त्यामुळे संघाला बाळासाहेब पेलले नसावेत असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमाला हजेरी लावण्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून संघ आणि भाजपाचे कान टोचले आहे. संघ स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे मानतो, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीच का बोलावले नाही हा एक प्रश्नच आहे. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी, आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जी गुरुवारी गेले. त्यावरून बराच गदारोळ केला. काँग्रेसवाले मूर्ख म्हणून त्यांनी हा थयथयाट केला. प्रणव मुखर्जी हे नागपुरात जाऊन काहीतरी बॉम्ब टाकतील असे वाटले होते, पण लवंगी फटाक्याचाही आवाज आला नाही. मुखर्जी यांचे नागपुरात जाणे जेवढे वाजले तेवढे संघ मंचावरील भाषण गाजले नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

प्रणवबाबूंनी देशात सुरू असलेल्या इतर गंभीर विषयांना स्पर्श करण्याचे टाळले. देशातील न्यायव्यवस्थेत जो असंतोष खदखदतो आहे त्यावर ते बोलले नाहीत. देशात महागाई आणि बेरोजगारीचा भडका उडाला आहे व सामान्य जनता त्यात मरत आहे. महागाई व बेरोजगारीचा वणवा विझवण्यात सरकारे कमजोर पडली आहेत. यावर एक अर्थतज्ञ म्हणून प्रणव मुखर्जी यांचे भाष्य अपेक्षित होते, पण मुखर्जी यांचे भाषण रेंगाळत राहिले. मुळात संघाने मुखर्जी यांना का बोलावले, त्यातून काय साध्य झाले, मुखर्जी यांनी नेमके काय मार्गदर्शन केले हे संघाचे प्रशिक्षण व बौद्धिक विभागाचे प्रमुखदेखील सांगू शकणार नाहीत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

संघाच्या व्यासपीठावर अनेक महनीय (?) व्यक्तींना बोलवायची प्रथा आहे. प्रणव मुखर्जी हा त्याच परंपरेचा भाग आहे. संघ स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे मानतो, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीच का बोलावले नाही हा एक प्रश्नच आहे. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी, आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशा घोषणेपुरतेच बाळासाहेबांचे हिंदुत्व मर्यादित नव्हते, तर अयोध्येतील कोसळलेल्या बाबरीची जबाबदारी घेऊन हिंदू डरपोक नाही, हिंदू आता मार खाणार नाहीत हे त्यांनी दाखवून दिले असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

बाळासाहेब देवरस, रज्जूभय्या, सुदर्शनजी या सरसंघचालकांशी त्यांच्या गाठीभेटी झाल्या आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबवला नाही, तर वीर सावरकरांप्रमाणे त्यांनी उघडपणे हिंदुत्वाचा प्रसार व पुकार केला. हिंदुत्वाच्या अंगावर चाल करून येणाऱ्यांवर ते तुटून पडले. त्यामुळे संघाला बाळासाहेब पेलले नसावेत असंही ते म्हणाले.

प्रणवबाबू व इतरांना निवृत्तीनंतर अशा व्यासपीठांची गरज भासते व त्यानुसार ते गेले. दुसरे असे की, संघ व्यासपीठावर जाऊन तुम्ही तुमची मते मांडलीत तरी संघ न कुरकुरता ती स्वीकारतो. ते फक्त या घटनेचा भविष्यात वापर कसा करता येईल याचे आडाखे बांधत असतात. प्रणव मुखर्जी यांना बोलावण्यामागे संघाचा तोच काहीतरी आडाखा असेल व तो जो काही अजेंडा असेल तो २०१९ च्या निवडणुकीनंतर उघड होईल अशी शंका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

त्यावेळी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार नाही असेच चित्र सध्या देशात आहे. तेव्हा लोकसभा त्रिशंकू राहिली व मोदी यांच्या पाठीशी इतर पक्ष उभे राहिले नाहीत तर प्रणव मुखर्जी यांना ‘सर्वमान्य’ म्हणून पुढे करून राष्ट्रीय सरकार बनवायचे असाही एक अजेंडा संघाच्या कार्यक्रमपत्रिकेवर असल्याचे दिल्लीत बोलले जाते असंही ते म्हणाले.

सध्या देशभरात रोजे-इफ्तार पाटर्य़ा जोरात सुरू आहेत. अशा इफ्तार पाटर्य़ांचे आयोजन काँग्रेसवाले करीत तेव्हा त्यांच्यावर मुस्लिम अनुनयाचा आरोप करीत ‘संघ’ परिवार टीका करीत असे. इफ्तार पाटर्य़ा हिंदुत्वाच्या संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणत. आता संघही रोजे-इफ्तार पाटर्य़ांचे आयोजन करीत आहे व त्यासाठी सरकारी यंत्रणा व सरकारी गेस्ट हाऊसचा वापर होत आहे. मागे ‘‘संघ आता बदलला आहे,’’ असे एका समाजवादी नेत्याने सांगताच ‘‘संघ बदलला नाही, तर संघाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे,’’ असे उत्तर बाळासाहेब देवरसांनी दिले होते. संघ खरंच बदलला आहे हे आता पटू लागले. इफ्तार पाटर्य़ा जेव्हा काँग्रेसवाले देतात तेव्हा ती धर्मांधता व संघ देतो तेव्हा ती सहिष्णुता असे आपण सगळ्य़ांनी समजून घ्यायलाच हवे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 7:19 am

Web Title: uddhav thackeray on rss and pranab mukherjee
Next Stories
1 मुंबई – फोर्ट परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग, १८ गाड्या घटनास्थळी
2 ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर, सातपैकी पाच खासदार महाराष्ट्राचे
3 पुढील वर्षांपासून दहावीतील गुणांची खैरात बंद
Just Now!
X