राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपावर अनेक मुदद्यांवरून निशाणा साधला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपाला शरजील उस्मानीच्या मुद्द्यावरून उत्तर देताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील सुनावलं. यासोबतच, “शरजील उस्मानीला आम्ही अटक केल्याशिवाय राहणार नाही”, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

“शरजील उस्मानी उत्तर प्रदेशची घाण”

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरजील उस्मानीच्या अटकेवरून निशाणा साधला होता. तसेच, “आम्ही शरजीलला पाताळातूनही शोधून काढू”, असं देखील सुनावलं होतं. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “शरजील उस्मानी ही उत्तर प्रदेशमधली घाण आहे. आमच्याकडची नाही. विरोधी पक्षनेते म्हणाले होते तो पाताळात गेला तरी आम्ही शोधून काढू. पण मग कधी जाणार? पाताळात नाही, त्याला शोधायला कधी जाणार? उत्तर प्रदेशात नुसतं राम मंदिर बांधून चालणार नाही. पाया ठिसूळ असेल आणि तिथे अशी देशद्रोही पिलावळ असेल आणि तिचं पालनपोषण उत्तर प्रदेशात होत असेल तर उगाच आमच्या अंगावर येऊ नका. शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला मदत करावी. पाया ठिसूळ आणि राम मंदिर बांधताय त्याला अर्थ नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“तुम्हाला नितीश कुमारांना डोक्यावर घेऊन…”

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टोला लगावला. “तुम्ही आमचं हिंदुत्व सांगता. पण संघमुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या नितीश कुमारांना डोक्यावर घेऊन तुम्हाला गणपती बाप्पा मोरया करावं लागतंय, काय हे तुमचं दुर्दैव! रामविलास पासवानांना मांडीवर घ्यावं लागलं. काय तुमचं हिंदुत्व आणि काय हे.. छे!” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघतोय असा भास झाला!”