News Flash

बोलाचीच लयलूट!

हिंमत असेल तर युती तोडा आणि अंगावर या..

सीमोल्लंघनाची प्रेरणा देणारी विजयादशमी हा रा. स्व. संघ आणि शिवसेनेचा विचारांचे सोने लुटण्याचा पारंपरिक दिवस! या दसऱ्याला संघाने अर्धविजारीची परंपरा मोडली पण विचारांचा परीघ नेहमीचाच ठेवला. तर हिंमत असेल तर युती तोडा, असे पुन्हा एकवार सांगत शिवसेनेने आपण मात्र युती तोडणार नाही, हेच सूचित केले. भगवानगडाच्या पायथ्याशीही पंकजा मुंडे यांनी हा ‘बोलभंडारा’ आणखी फुलवला आणि मराठा आरक्षणाचे समर्थन केले. लखनऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामलीलेत भाषण करून युद्ध नव्हे तर बुद्ध हेच आमचे ध्येय असल्याचे जाहीर केले!

हिंमत असेल तर युती तोडा आणि अंगावर या..

पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या कोणाला तरी स्वबळाची खुमखुमी येते. २५ वष्रे मित्र असलेल्यांकडून पाठीत वार सुरू आहेत, मात्र पाठीत वार करू नका. हिंमत असेल तर युती तोडा आणि अंगावर या. आम्ही लेचेपेचे नाहीत, वाघाचे बछडे आहोत. कोणी अंगावर आले तर सोडणार नाही. मोदी सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले, हे उत्तमच केले. पण भाजपने युती तोडून दाखवावीच, मग शिवसेनेच्या वाघाचे बछडे  ‘सर्जिकल स्ट्राइक’ दाखवतील. राज्यातील भाजपचा नेता कोण हे आधी मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. शिवसेना भाजपच्या मागे भीक मागत फिरणार नाही. – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

 

कितीही घेरले तरी घाबरत नाही!

भगवानगडावरील ‘कट, कारस्थानांचा बुरुज’ उतरून मी पायथ्याशी आले आहे. मला कितीही घेरले आणि राजकारणात माझा अभिमन्यू केला तरी लोकांचे पाठबळ असल्याने मी कोणाला घाबरत नाही. मी तुमची नेता नाही, तर माता आहे. समाजात पूर्वी शेतकरी, कष्टकऱ्यांचे मोच्रे निघत होते. आता जातीचे मोच्रे निघत आहेत. त्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेचा उपयोग काय? मराठा, ओबीसी, दलित सर्वाना न्याय मिळाला पाहिजे. पण इतके दिवस का दिला नाही? मराठा समाजाचे नेते अनेक वष्रे सत्तेत असतानाही त्यांच्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या दसऱ्याला मला त्रास देण्यात आला. पण पुढल्या दसऱ्याला गादीवर बसलेले हेच महंत मला कन्या म्हणून सन्मानाने गडावर बोलावतील. – पंकजा मुंडे

 

प्रामाणिक व पाखंडी गोसेवक सरकारने ओळखावा

देशात पशुहिंसाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार सरकारने गोरक्षा करणे आवश्यक आहे. मात्र, सरकारकडून संबंधित कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने गोसेवक पुढे येऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरतात. त्या प्रकारांना अतिरंजितपणे मांडण्यात येऊ नये.  स्वार्थासाठी समाजात दुफळी निर्माण होईल, असे काही करू नये.  प्रामाणिक गोसेवक व पाखंडी गोसेवक यांच्यातील फरक सरकारने ओळखावा आणि मग दोषींवर कारवाई करावी. – मोहन भागवत, सरसंघचालक

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 12:54 am

Web Title: uddhav thackeray pankaja munde and mohan bhagwat speech
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी १० मराठी चित्रपटांची निवड
2 नौदलाला सेवा पुरविण्याआडून मद्यतस्करी
3 नाना शंकरशेठ उड्डाणपुलाखालीही उद्यान आणि जॉगिंग ट्रॅकची मागणी
Just Now!
X