शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव असलेल्या एका ट्विटर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाला बाळकडू पाजण्यात आले असून, राज्यात शिवसेनेची पूर्ण सत्ता नाही. आम्ही फक्त सरकार स्थिर केले असल्याचे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटर हॅंडलच्या प्रोफाईलमध्ये ‘अनऑफिशियल अकाऊंट ऑफ उद्धवसाहेब’ असा उल्लेख असून, त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचे ट्विट्स आणि उद्धव ठाकरे यांच्या विविध कार्यक्रमांची छायाचित्रे रिट्विट करण्यात आली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृतपणे या ट्विटबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सरकारकडून आम्हाला चांगल्या कामाची अपेक्षा आहे. जर मराठी माणसावर अन्याय झाला तर शिवसेना खासदार आणि आमदार संघर्ष करतील, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांचे नाव असलेल्या या ट्विटर हॅंडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली होती. त्यानंतर हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या इतर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर निकालांमध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत न मिळाल्याने या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत राज्यात तब्बल १५ वर्षांनतर युतीचे सरकार स्थापन केले.