धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूवरून शिवसेनेने भाजपाला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अप्रत्यक्षरित्या भाषण माफिया असे संबोधत टीकास्त्रही सोडले. भाषणबाजीने रोटी, कपडा आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली असा आरोप करत मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजपा चालवू नका, असा खोचक सल्लाही सेनेने दिला. धर्मा पाटलांची चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल. पाटील यांचे अधर्माच्या राज्यात ऐकणारे कुणी नव्हते. भाषण माफियांना डोलणारी व टाळ्या वाजवणारी माणसे हवी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच धर्मा पाटलांचे सत्य कोण ऐकणार, असा सवाल उपस्थित केला.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून भाजपच्या केंद्र व राज्यातील नेतृत्वावर टीका करण्यात आली. धुळ्यातला ८४ वर्षीय वृद्ध शेतकरी मुंबईत मंत्रालयाच्या दारात न्याय मागण्यासाठी येतो. पण त्याला न्याय नाकारला जातो. तेव्हा त्याच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करतो, हे उत्तम राज्याचे लक्षण नसल्याचे सेनेने म्हटले. अच्छे दिन आल्याची चित्रे रंगवणाऱ्या थापेबाज टोळीने धर्मा पाटील यांची हत्या केल्याचा आरोप केला. बागायत शेतीला शासनाने पाच लाखांचा मोबदला दिला. त्याच गटातील दुसऱ्या शेतकऱ्याला दोन कोटी रूपये दिले. ही शेतकऱ्याची निर्घृण हत्या आहे. सरकारी यंत्रणेने त्यांचा आवाज ऐकला नाही.

धर्मा पाटील यांच्या हत्येस सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. संबंधित खात्याच्या मंत्री व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ही विरोधी पक्षाची मागणी चुकीची नसून हाच न्याय गृहीत धरला तर त्यांच्या सत्ता काळातील १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री व सरकारवही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. दावोस येथे परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री लवाजमा घेऊन गेले. पण जेव्हा स्वदेशात शेतकरी आत्महत्या करत होते. त्यावेळी ही परदेशी गुंतवणूक चाटायची आहे का, असा सवालही सेनेने उपस्थित केला.