सत्तेच्या समान वाटपाबाबत उद्धव ठाकरे पुन्हा आग्रही

राज्यात सत्तापदांचे वाटप समान होईल असे युतीच्या चर्चेवेळी ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते जाहीर केले होते. त्याची चित्रफीतही आहे, त्यामुळे ‘मुख्यमंत्री पदाबाबत काही ठरले नव्हते’ या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानास अर्थ नाही. मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेले नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची भूमिकाच आहे. जे ठरले तेच हवे, असा सूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत लावला.

शिवसेना भवनात गुरुवारी दुपारी झालेल्या बैठकीत युवा सेनानेते आदित्य ठाकरे, विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत, ‘असा काही निर्णय माझ्यासमोर झाला नव्हता’, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. त्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री सत्तेच्या समान वाटपाबाबत काय म्हणाले याची चित्रफीत उपलब्ध असताना त्यांनी असे बोलावयास नको होते. पद आणि जबाबदारीचे समान वाटप करण्याचे ठरले होते. भाजपकडून आता तेच अपेक्षित आहे. सुईच्या टोकावर मावेल इतके वा त्यापेक्षा अधिक नव्हे, तर जे ठरले तेच हवे, असे ठाकरे यांनी ठणकावले.

भाजपकडून सत्ता वाटपाबाबत ठोस प्रस्ताव आलेला नाही. संपर्क-संवाद सुरूच असतो. तो भाजपबरोबरही सुरू आहे आणि इतर पक्षांचे नेतेही संपर्क साधत आहेत. सत्ता स्थापनेची घाई नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना भाजपपुढे नरमाईची भूमिका घेणार नाही, असा संदेश ठाकरे यांनी दिल्याचे मानले जाते.

शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे

विधिमंडळात शिवसेनेचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी करावे अशी फलकबाजी कार्यकर्त्यांकडून सुरू असताना गुरुवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळातील गटनेतेपदी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. भाजप-शिवसेनेत समन्वयाची भूमिका पार पाडणारे अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. भाजपने बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फेरनिवड केली. त्यानंतर गुरुवारी शिवसेनेने पक्षाचा विधिमंडळातील नेता निवडण्यासाठी शिवसेना भवन येथे आमदारांची बैठक बोलावली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, संजय राठोड, सदा सरवणकर, राजन साळवी यांनी अनुमोदन दिले. याच बैठकीत आमदार सुनील प्रभू यांची विधिमंडळातील शिवसेनेचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता सुनील प्रभू यांना संभाव्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, हे स्पष्ट झाले.