“खिळे जुळवण्याचा काळ आता गेला, खिळे मारण्याचा काळ आता सुरु झाला. विरोधकांनीही त्याची खात्री पटली असेल की आता सगळं कठीण आहे.” असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा वार्षिक पुरस्कार सोहळा आज पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे.

” शिवसेनाप्रमुखांचा मुलगा, प्रबोधनकारांचा नातू यामुळे पत्रकारिता ही आमच्या घराण्यात आहे. राजकारणात आल्यावर घराणेशाहीवर टीका झाली. पण काही काळ मीही सामनाचा संपादक होतो. आता हे स्वीकारल्यामुळे ते सोडावं लागलं. पत्रकारितेची ताकद वाढो राहो ” अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्या.

आपल्या भाषणात त्यांनी महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांची दखल घेतली. “महिलांवर अत्याचार कसे थांबवायचे? काय करायचं? तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी कायदे केले तसा कायदा आणायचा का? नेमका तो कायदा कसा आणायचा याबाबत अभ्यास सुरु आहे.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“आम्ही सर्व पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की महिलांवरचे अत्याचार या सुसंस्कृत महाराष्ट्रात मुळीच सहन केले जाणार नाही. जे कोणी आरोपी असतील त्यांना उचला, आणा, फटकावायचं तर फटकवा आणि तातडीने त्यांच्यावर केस दाखल करा. या आरोपींना तातडीने शिक्षा केली गेली पाहिजे हा सरकारचा आग्रह आणि निग्रह आहे” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.