ताकद नसतानाही उगाच दंडाच्या बेडक्या फुगवून अंगावर येण्याचा प्रयत्न करू नये. शिवसैनिकांची ताकद काय आहे ते कळले असेल. शिवसैनिक हा ढाण्या वाघ आहे. त्याच्या नादाला लागू नका, असा टोला नारायण राणे यांच्या नावाचा उच्चारही न करता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हाणला. विजयाचा आनंद लुटायचा असून नको ती नावेही उच्चारण्याची इच्छा नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय मी तमाम शिवसैनिकांना अर्पण करतो. मातोश्रीच्या अंगणातला हा विजय असल्यामुळे त्याला खूपच महत्त्व प्राप्त झाले होते. आमचा बाळा सावंत गेला. परंतु त्याची जनतेशी नाळ जुळलेली होती. जी जी वचने त्यांनी मतदारांना दिली आहेत ती पूर्ण केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. आशीर्वाद देणारे हात आणि मने नेहमी लक्षात ठेवा. ती दुखावली गेली की काय पदरात पडते हे वांद्रय़ातील निवडणुकीतून स्पष्ट झाल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
कुणाचा पराभव झाला हे महत्त्वाचे नाही. मात्र निष्ठेचा विजय झाला आहे. मी कुणाचेही वाईट चिंतणार नाही. विजय झाला हे महत्त्वाचे आहे. शिवसैनिक विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाही. परंतु अंगावर आला तर त्याला शिंगावरच घेतो, असे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांचा हवाला देऊन सांगितले.
 नारायण राणेंचे राजकीय भवितव्य काय वा राणे यांनी शिवसेनेत परत येण्याचा प्रयत्न केला होता का, आदी प्रश्नांवर उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. मात्र त्यांचे काँग्रेस भले करो. कारण देव त्यांचे कधीच भले करू शकत नाही, असे विधान ठाकरे यांनी पुन्हा राणेंचा उल्लेख न करता केले.
एमआयएमला या निवडणुकीत मुस्लिमांकडून प्रतिसाद मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना बेहरामपाडा, भारतनगरमधील मुस्लिमांनी शिवसेनेला मतदान केल्याचा दावाही ठाकरे यांनी केला. आपला कोण आणि परका कोण याची त्यांना आता निश्चितच कल्पना आली असेल, असेही ते म्हणाले.
 ‘सामना’त मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्या वा विचारांची नसबंदी आदींबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, मराठी भाषा समृद्ध आहे. त्या लेखाचा अर्थ नीट समजावून घ्या. आतापर्यंत मुस्लिमांचा वापर फक्त व्होट बँक म्हणून करण्यात आला आहे. ही व्होट बँक बंद झाली तर काय अवस्था होईल, असे त्यात अभिप्रेत होते. मुसलमानांना संपवून टाकू, असे बाळासाहेबांनी कधीही म्हटले नव्हते. परंतु एक ओवेसी हिंदूंना संपवून टाकू, अशी ओरड करीत आहे.
 मुस्लिमांना संपवून टाकण्याच्या उद्गाराबाबत जेवढी आगपाखड होत आहे, तेवढी हिंदूंबाबतच्या उल्लेखासंदर्भात होत नाही, हे दुर्दैव असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शरद पवारांनी दिलेल्या सल्ल्याचा आम्हाला फायदाच झाला. पवारांनी असेच सल्ले देत राहावे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
निवृत्त व्हा- राणेंना सल्ला
नारायण राणे यांनी आता राजकारणातून निवृत्त होऊन आपला कोंबडी विकायचा धंदा पुन्हा सुरु करावा, अशी खरमरीत टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. राणे यांच्या पराभवानंतर शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविण्यास सुरुवात केली आहे. राणे आणि विचार यांचा छत्तीसचा आकडा आहे. मुलांचाही विचारांशी काही संबंध नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
एमआयएमची अनामत जप्त
वांद्रे (पूर्व) निवडणुकीत एमआयमचे आव्हान असल्याची चर्चा असली तरी त्यांचे उमेदवार रेहबर सिराज खान यांना १५ हजार ५० मतेच मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत एमआयएमला १९८५६ मते मिळाली होती.
‘नोटा’ चौथ्या क्रमांकावर
वांद्रे(पूर्व) येथून १० उमेदवार निवडणुकीच्या िरगणात होते. शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम वगळता अन्य उमेदवारांना अगदीच किरकोळ मते मिळाली. नोटा या पर्यायाला पसंती देणाऱ्या मतदारांची संख्या ८१९ होती. त्यामुळे तीन प्रमुख उमेदवारांनंतर ‘नोटा’ चा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही चौथ्या क्रमांकाची ठरली.