महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या भाडेपट्टीचा करार संपुष्टात आल्यामुळे त्या जागेवर मुंबईकरांसाठी ‘थीम पार्क’ उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन ‘थीम पार्क’चा आराखडा सादर केला.
रेसकोर्सच्या जागेच्या कराराची मुदत संपण्याच्या पाश्र्वभूमीवर महापौर सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहून या जागेवर आंतरराष्ट्रीय उद्यान करण्याची मागणी केली होती.
या उद्यानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव देण्याचा शिवसेनेचा छुपा अजंडा होता. मात्र रेसकोर्सच्या साडेआठ लाख चौरस मीटर भूखंडापैकी पालिकेच्या मालकीचा केवळ अडीच लाख चौरस मीटर भूखंड असून राज्य शासनाच्या मान्यतेशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे आयुक्त कुंटे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोणतेही राजकारण न करता या ठिकाणी उद्यान व्हावे अशी भूमिका मांडली. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ‘थीम पार्क’चे संकल्प चित्र सादर करण्याची घोषणा केली. त्यानुसार उद्धव यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांची रविवारी भेट घेऊन त्यांना थीम पार्कचे संकल्पचित्र सादर केले.
सर्वाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.