युतीच्या चर्चेचे संकेत; नागपूरला अधिवेशन घेण्याच्या निमित्ताने भेट

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा करण्याच्या निमित्ताने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी आगामी निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती करण्याबाबत ठाकरे यांना राजी करण्यासाठी चर्चा होणार असल्याचे समजते.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असते. पण त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत राज्य सरकारने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची समिती नेमण्यात आली आहे. त्यासाठी सत्तेतील भागीदार पक्षाचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर जाणार आहेत. याच भेटीच्या निमित्ताने मुनगंटीवार आणि ठाकरे यांच्यात भाजप-शिवसेना युतीबाबत चर्चा होण्याचे संकेत आहेत.

पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी होणार असल्याने सत्ताधारी भाजप-शिवसेना युती कायम राहिली पाहिजे, अशी भाजपची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वेळोवेळी शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यातूनच शिवसेनेला राजी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदार यांच्याशी अनौपचारिक चर्चा करत त्यांचा मानस काय आहे याचीही चाचपणी केली आहे. त्यात युती होणे हेच दोन्ही पक्षांच्या फायद्याचे आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढत असताना भाजप-शिवसेना दोघे वेगळे लढल्यास हातातील सत्ता जाण्याची भीती आहे,  असाच सूर शिवसेनेच्या बहुतांश मंत्री, आमदारांनी व्यक्त केल्याचे समजते. त्याचबरोबर १९९९ ला युती एकत्र असताना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस वेगळे असतानाही युतीमधील  पाडापाडीच्या राजकारणातून सत्ता गेली आणि १५ वर्षे विरोधी पक्षात बसायची वेळ आली. आता सत्ता हातात असताना आणि राज्य सरकारचे कामकाज व्यवस्थित सुरू असताना १९९९ सारखी चूक पुन्हा करण्यात अर्थ नाही, या वास्तवाकडेही उद्धव यांचे लक्ष वेधले जाणार आहे.

२०१४ चा आधार सोडण्याबाबत भाजपमध्ये विचार

२०१४ च्या निवडणुकीत भाजपला १२३ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. त्याच आधारावर जागावाटप झाले तर शिवसेनेच्या हाती फारसे काही पडणार नाही. त्यामुळेच ठाकरे हे युतीबाबत साशंक असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे २०१४ च्या जागा हा संभाव्य जागावाटपात एकमेव आधार मानू नये. त्याऐवजी सध्याची राजकीय परिस्थिती व २०१४ नंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा साधक-बाधक विचार करून जागावाटपाबाबत बोलणी करावीत, अशी भूमिका भाजपच्या काही वरिष्ठ मंत्र्यांनी पक्षात मांडल्याचे समजते. त्या माध्यमातून शिवसेनेला विश्वास देऊन युतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करता येईल, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.