महापालिकेने सादर केलेल्या मुंबईच्या नव्या विकास आराखडय़ाच्या प्रारूपात चटईक्षेत्र निर्देशांकाची खैरात करण्यात आली आहे. यामुळे गरीब माणसाला ५०० चौरस फुटांचे घर मिळू शकेल का? असे न होता केवळ बिल्डरांची धन झाल्यास या विकास आराखडय़ाचा शिवसेना कडाडून विरोध करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिला.
वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २०१२-२०३४ या कालावधीतील विकास आराखडय़ाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि काही नेते उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईसाठी दोन विकास आराखडय़ांची अंमलबजावणी झाली, मात्र विकास आराखडय़ांमधील योजना कागदांवरच राहिली. आता आगामी २० वर्षांच्या विकास आराखडय़ाच्या प्रारूपात वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाची खैरात करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे गरिबांना ५०० चौरस फुटांचे घर मिळेल का, असा सवाल त्यांनी या वेळी केला. पालिकेने इंग्रजीमध्ये विकास आराखडय़ाचे प्रारूप प्रसिद्ध केले आहे. हे प्रारूप मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध करा आणि मुंबईतील चाळी, झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तो समजावून सांगा, असेही त्यांनी प्रशासनाला आवाहन केले.
या आराखडय़ामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कांदळवन, सरकारी कार्यालयांचा मोकळा भाग खुली जागा म्हणून दाखविण्यात आला आहे. एवढा मोठा अथांग सागर होता. त्याचाही खुली जागा म्हणून आराखडय़ात समावेश करायचा होता, म्हणजे मोठा परिसर उपलब्ध झाला असता, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.