चार दिवसांत मराठवाडय़ाचा आज दुसरा दौरा; केवळ मुंबई, ठाण्यावर सत्ताप्राप्ती कठीण असल्याची पक्ष नेतृत्वाला कल्पना

जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकांच्या काळात मुंबईच्या बाहेर पाऊल न टाकलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्याच्या ग्रामीण भागातील दौरे वाढले आहेत. फक्त शहरी भागांवर अवलंबून चालणार नाही याची कल्पना असल्यानेच ठाकरे यांनी राज्याच्या ग्रामीण भागावर आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून चार दिवसांत उद्या मराठवाडय़ाचा दुसरा दौरा करणार आहेत.

जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकांच्या काळात शिवसेना वगळता सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रचारासाठी राज्यभर दौरे केले होते. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. भाजपचे सारे मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व नेत्यांनी राज्याचा सारा भाग पिंजून काढला. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांनी राज्यभर दौरे केले. राष्ट्रवादीत अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदी नेत्यांनी राज्यात दौरे केले. याउलट शिवसेनेत प्रचाराची सारी धुरा स्थानिक नेत्यांनी सांभाळली. शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची होती. यामुळेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत ठाण मांडून बसले होते. जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार काळात ते कुठेच बाहेर गेले नाहीत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्यावर मात्र उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मध्यावधी निवडणुकीचे पिल्लू भाजपच्या गोटातून सोडण्यात आले. यामुळे सर्वच राजकीय पक्ष सावध झाले आहेत. शिवसेनेनेही गाफील न राहता निवडणुका झाल्याच तर त्या दृष्टीने पावले टाकली आहेत. महिनाभरात ठाकरे यांनी अकोला, बुलढाणा या पश्चिम विदर्भात दौरे केले. गेल्या सोमवारी त्यांनी औरंगाबादचा दौरा केला होता. उद्या नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या मराठवाडय़ातील जिल्ह्य़ांचे दौरे करणार आहेत.

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले होते. पण गेल्या विधानसभा निवडणुकीपासून मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात भाजपने जोर लावला. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या या प्रभाव क्षेत्रांमध्ये भाजपने चांगले यश मिळविले. परभणी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला, पण या महानगरपालिकेत शिवसेनेपेक्षा भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आले. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मराठवाडय़ात लक्ष घातले आहे.

सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे श्रेय फक्त भाजपला मिळू नये या उद्देशानेच ठाकरे यांनी मराठवाडय़ाचा दौरा सुरू केला आहे. कर्जमुक्तीकरिता शिवसेनेने मागणी केली होती. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात शिवसेनेनेच महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले जात आहे.

एकाच दिवशी चार जिल्ह्य़ांचा दौरा

कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय शिवसेनेला मिळावे या उद्दशानेच उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी चार जिल्ह्य़ांचा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना या मराठवाडय़ातील चार जिल्ह्य़ांमध्ये ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे हे साधारणपणे एका दिवशी एकाच शहराचा दौरा करतात. यंदा चार जिल्ह्य़ांमध्ये धावता दौरा करणार आहेत. मराठवाडय़ात शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याच्या उद्देशानेच ठाकरे यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मराठवाडय़ात विधानसभेच्या ४६ जागा असून, गेल्या वेळी शिवसेनेच्या जागा कमी झाल्या होत्या. यामुळेच शिवसेनेची ताकद वाढविण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

कर्जमाफीचे श्रेय!

सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे श्रेय फक्त भाजपला मिळू नये या उद्देशानेच ठाकरे यांनी मराठवाडय़ाचा दौरा सुरू केला आहे. कर्जमुक्तीकरिता शिवसेनेने मागणी केली होती. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात शिवसेनेनेच महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले जात आहे.  उद्धव ठाकरे हे साधारणपणे एका दिवशी एकाच शहराचा दौरा करतात. यंदा चार जिल्ह्य़ांमध्ये धावता दौरा करणार आहेत.