पक्षबांधणीत विभाग प्रमुख, शाखा प्रमुखाबरोबर आता कार्यालय प्रमुखही पुढे

भाजपची मुंबईत सुरू झालेली मोर्चेबांधणी आणि पक्षातील आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेले वाद यामुळे त्रस्त झालेल्या ‘मातोश्री’ला आतापर्यंत अडगळीत पडलेल्या कार्यालय प्रमुखांचे स्मरण झाले असून दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यालय प्रमुखांना जवळ करीत शिवसेनेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत, तर कार्यालय प्रमुखांमार्फत स्थानिक पातळीवरील अनेक बित्तंबातम्यांचे खलिते ‘मातोश्री’वर पोहोचते होण्याच्या शक्यतेने स्थानिक नेत्यांच्या पोटात भीतीने गोळा उठला आहे. मात्र ‘मातोश्री’च्या या खेळीमुळे कार्यालय प्रमुख विरुद्ध शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेमध्ये विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना महत्त्वाचे स्थान आहे. विभागामध्ये घडणाऱ्या घडामोडी, पक्षाचे कार्यक्रम, सभा, बैठकांचे आयोजन, पक्षांतर्गत फेरबदल आदी विविध प्रक्रियांमध्ये विभाग प्रमुखांचा महत्त्वाचा सहभाग असतो. इतकेच नव्हे तर विधानसभा, पालिका निवडणुकांमध्ये विभाग प्रमुखांमार्फत इच्छुक उमेदवारांची यादी ‘मातोश्री’वर मागविली जाते. विभाग प्रमुखांनी सादर केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या यादीमधील एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करून ‘मातोश्री’मार्फत त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाते. विभाग प्रमुखाप्रमाणेच शाखा प्रमुखांनाही कायम ‘मातोश्री’च्या संपर्कात राहावे लागते.

शिवसेनेच्या शाखेतील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी मुख्यत्वे कार्यालय  प्रमुखावर सोपविण्यात आली आहे. शिवसेनेच्या शाखेची किल्ली बहुतांशी त्याच्याच जवळ असते. नित्यनियमाने कार्यालय प्रमुख शाखेत येत असतात. पत्रलेखन, तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे अर्ज स्वीकारणे अशी छोटी-मोठी कामे कार्यालय प्रमुख करीत असतात; परंतु आतापर्यंत कार्यालय प्रमुखांना शिवसेनेत महत्त्वाचे स्थान नव्हते. ‘मातोश्री’ अथवा सेना भवनमध्ये विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांचेच वजन होते. मात्र आता अचानक कार्यालय प्रमुखांनाही शिवसेनेत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच कार्यालय प्रमुखांची बैठकच आयोजित करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ात अचानक ‘मातोश्री’ने शिवसेना शाखांमधील कार्यालय  प्रमुखांना बैठकीस उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले. दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे बैठक घेणार असल्याचे समजताच कार्यालय प्रमुख गर्भगळीतच झाले. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही मोजक्या मंडळींसह कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली. शाखांमधील प्रशासकीय कामासोबत पक्षबांधणीकडे लक्ष देण्याचे आदेश कार्यालय प्रमुखांना देण्यात आले.

  • भाजपने मुंबईत सुरू केलेल्या मोर्चेबांधणीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित केले असून या कामात शाखांमधील कार्यालय प्रमुखांनाही सहभागी करून पक्षाचा पाया भक्कम करण्याचा उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. मात्र कार्यालय प्रमुखांना ‘मातोश्री’चे बळ मिळाल्यामुळे शाखा प्रमुख, स्थानिक आजी-माजी आमदार, नगरसेवक आदींचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शाखाशाखांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.