मुंबई अग्निशामक दलाच्या एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही आग लावणारे नसून, आग विझवणारे आहोत, असे सूचक वक्तव्य शुक्रवारी केले. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नव्या रिक्षांचा मुद्दा उपस्थित करीत त्या जाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर विक्रोळीमधील या कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी वरील उत्तर दिले.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दल ते म्हणाले, जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका. हा आवाज जोपर्यंत एकमुखी देशामध्ये उमटत नाही. तोपर्यंत पाकिस्तानचे चाळे थांबणार नाहीत. मतांचे राजकारण करताना आपण देशाचा घात तर करत नाही ना, याचा विचार प्रत्येकाने करावा. पाकिस्तान क्रिकेट संघ धरमशालाऐवजी कोलकात्यात भारतासमोर ट्वेंटी-२० खेळणार, ममता बॅनर्जी यांनी त्यांना पूर्ण सुरक्षा दिले, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सामना करू देण्यास नकार दिला होता, त्यावर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.