सीमेवर अशांतता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीबद्दल सत्ताधारी भाजपने समाधान व्यक्त केले असताना मित्रपक्ष शिवसेनेने मात्र याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायला हवे, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यामध्ये धमक आहे आणि ते पाकिस्तानला धडा शिकवू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मोदी आणि शरीफ यांची शुक्रवारी रशियातील उफामध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर सुमार दीड तास चर्चा झाली. दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध करतानाच त्यावर एकत्रितपणे लढा देण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी सीमेवर अशांतता असताना पाकिस्तानला धडा शिकवायला हवा, असे उत्तर दिले. मोदी हे करू शकतात, असाही टोला त्यांनी लगावला.