विश्वासदर्शक ठरावाची चाचणी मोठ्या विश्वासानं जिकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांचे आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानले. जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते असेही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझ्यावर मंत्रिमंडळाने आणि सभागृहाने जो विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर मी सर्व जनतेचे देखील आभार मानतो, त्यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. इथं येताना दडपण होतं, कारण इथं कसं वागायचं हे मला ठाऊक नव्हतं.

मी मैदानातला माणूस असून सभागृहात कसं होईल याची मला चिंता होती. पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं, अशा शब्दांत सभागृहात भाजपाने घातलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली. मी समोरा-समोर लढणारा आहे शत्रूला अंगावर घेणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली. जर हा गुन्हा असेल तर मी  पुन्हा पुन्हा, प्रत्येक जन्मात अशी शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाने सभागृहात मांडलेल्या आक्षेपाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. सभागृहाच्या कामकाजाची पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इथे माडंले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.