उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, असंख्य मराठी माणसांच्या मनात असलेल्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राज आणि मला एकत्र आणून समोरासमोर बसवा आणि मग दोघांना हा प्रश्न विचारा. या प्रश्नाचे उत्तर दोन्ही बाजूंवर अवलंबून असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या दुसऱया भागात त्यांनी या विषयावर भाष्य केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी माणसाच्या भल्यासाठी काम करावे, याबद्दल जोरदार प्रयत्न होऊ लागले. राज ठाकरे यांनी या विषयावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मुलाखतीमध्ये यासंदर्भात उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी काही सूचक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, प्रश्न महत्त्वाचा हा आहे की, एकत्र येण्यापूर्वी दूर का गेलो? एकत्र येणार असू, तर काय म्हणून एकत्र येतोय? आपण कोणाच्याविरुद्ध उभे आहोत? आपला राजकीय शत्रू कोण आहे? राजकारणातून आपल्याला कोणाला संपवायचे आहे?
भविष्यात तुम्ही दोघे एकत्र याल का, यावर उद्धव ठाकरे यांनी टाळी एका हाताने वाजत नाही, असे सूचक वक्तव्य केले. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली. मराठी माणसांसाठी खस्ता खाल्ल्या. मराठी माणसाला याची जाणीव आहे. तो गोंधळून जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.