शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला काहीही अर्थ नाही. हा दौरा फक्त मतं मिळवण्यासाठी केला जातो आहे. पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. अशात आपल्या पक्षाचं महत्त्व वाढवून घ्यायचं आणि मग मतं मागायची हा या मागचा मूळ उद्देश आहे असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. राम मंदिराच्या मागणीसाठी जोर वाढतो आहे. अशात शिवसेनेनेही राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी केली. आता उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन तिथल्या सगळ्या पक्षकारांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे इतर नेतेही असणार आहेत. संत समाजाच्या प्रतिनिधींची राम मंदिराबाबत काय भूमिका आहे ते उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत.

अयोध्या मंदिर वादाशी निगडीत सगळ्याच पक्षकारांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत असेही समजते आहे. केंद्र सरकार विनाकारण राम मंदिराच्या निर्मितीला विलंब करत आहे असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. मात्र काँग्रेसने या दौऱ्याला काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे.