शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी विधानभवनात आले होते. पण ही भेट होऊ शकली नाही. उद्धव ठाकरेंनी तब्बल अडीच तास मुख्यमंत्र्यांची प्रतिक्षा केली. पण मुख्यमंत्री सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्याने ही भेट होऊ शकली नाही असे एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. भेटता न आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पण विधिमंडळामध्ये या टळलेल्या भेटीबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
उद्धव ठाकरे भेटीसाठी येणार मग मुख्यमंत्र्यांनी वेळ का राखून ठेवली नाही ? तसेच मुख्यमंत्री सभागृहाच्या कामकाजात कधी व्यस्त असतात हे शिवसेनेच्या मंत्र्यांना माहिती नव्हते का ? असा प्रश्न राजकीय जाणकारांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना आमदारांच्या प्रलंबित मागण्या व निधीअभावी रखडलेल्या विकासकामांच्या मुद्यांवर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. राज्यात युतीचे सरकार असले तरी शिवसेना पहिल्या दिवसापासून या सरकारवर टीका करत आली आहे. दरम्यान भाजपाने शिवसेनेसोबत युती करण्यासाठी अनुकूलता दाखवल्यानंतर शिवसेनेकडूनही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले होते. पण आता ही भेट टळल्यामुळे याचे राजकीय पडसाद कसे उमटतात ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.