दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात केलेल्या ‘प्रोबेट’वर निर्णय येण्याआधीच उद्धव ठाकरे आपल्या पदाचा दबाव आणून ठाकरे यांची संपत्ती हस्तांतरीत करू शकतात वा ती विकू शकतात, असा संशय जयदेव ठाकरे यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात व्यक्त करण्यात आला. ‘प्रोबेट’वर निकाल येईपर्यंत आपल्याला अंतरिम दिलासा देण्याची मागणी जयदेव यांनी पुन्हा एकदा केली.
ठाकरे यांच्या मृत्युपत्राबाबतच्या ‘प्रोबेट’ला ‘नोटीस ऑफ मोशन’द्वारे जयदेव यांना आव्हान देता येऊ शकते का आणि त्याअंतर्गत त्यांना दिलासा दिला जाऊ शकतो का, असा सवाल खुद्द न्यायालयानेच मागील सुनावणीच्या वेळी उपस्थित केला होता. गुरुवारी न्यायालय त्याबाबत निर्णय देण्याची शक्यता असून न्यायालय जयदेव यांचे ‘नोटीस ऑफ मोशन’ फेटाळणार की स्वीकारून त्यांना दिलासा देणार हे निश्चित होणार आहे.
न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी जयदेव यांच्या ‘नोटीस ऑफ मोशन’ला आव्हानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे निकाल विचारात घेऊन त्यावर युक्तिवाद करण्याचे निर्देश जयदेव यांच्या वकिलांना दिले होते.
बाळासाहेबांच्या संपूर्ण संपत्तीचा ताबा उद्धव यांच्याकडे आहे आणि बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रात नमूद संपत्तीबाबतच आपण दिलासा मागत आहोत. आपण उद्धवकडे संपत्तीच्या ताब्याबाबत दिलेल्या अधिकाराला आव्हान दिलेले नाही वा संपूर्ण संपत्ती आपलीच आहे. असा दावाही करीत नाही, असेही जयदेव यांच्या वकिलांनी सांगितले. भारतीय वारसा कायद्यानुसार जयदेव यांना संपत्तीसंदर्भात अंतरिम दिलासा मागण्याचा अधिकार असल्याचा दावा करीत अॅड्. सीमा सरनाईक यांनी सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखलेही या वेळी दिले. त्याआधारे जर मृत्यूपत्र नसेल वा ते सिद्ध करण्यात अपयश आले तर संपत्तीत आपणही भागीदार ठरू शकतो, असेही जयदेव यांच्यावतीने सांगण्यात आले. जयदेव यांच्या युक्तिवादाला उद्धव यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात आला.