07 March 2021

News Flash

पनवेलजवळील जमीन व्यवहाराशी ‘यूएफओ मूव्हीज’चा संबंध नाही

पनवेलजवळील दोन हजार एकर जमिनीच्या संपादनाशी ‘यूएफओ मूव्हीज इंडिया लि.’चा काहीही संबंध नाही.

| March 17, 2015 12:04 pm

पनवेलजवळील दोन हजार एकर जमिनीच्या संपादनाशी ‘यूएफओ मूव्हीज इंडिया लि.’चा काहीही संबंध नाही. पनवेलजवळ कसलाही प्रकल्प उभारण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी आम्ही संपर्क साधला नव्हता. याबाबतची तक्रार चुकीची व बदनामीच्या हेतूने प्रेरित असल्याचे ‘व्हॅल्यूएबल ग्रुप’चे संजय गायकवाड व नरेंद्र हेटे यांनी स्पष्ट केले आहे.
‘यूएफओच्या संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल’ व ‘संजय गायकवाड यांना समन्स’ असे वृत्त १३ व १४ मार्च रोजी प्रकाशित झाले होते. गीतांजली जगताप यांच्या तक्रारीनुसार ‘व्हॅल्यूएबल ग्रुप’चे संजय गायकवाड व नरेंद्र हेटे यांच्यावर पैसे थकवल्याबद्दल आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे त्यात म्हटले होते. मात्र, या प्रकरणाशी ‘यूएफओ मूव्हीज इंडिया लि.’चा संबंध नाही. हे प्रकरण ‘व्हॅल्यूएबल प्रॉपर्टीज प्रा. लि.’ या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीची मालकी वा नियंत्रण ‘व्हॅल्यूएबल ग्रुप’कडे नाही. त्याचबरोबर जगताप यांनी केलेली तक्रार चुकीची असून बदनामीच्या हेतूने प्रेरित आहे. जगताप यांची ही तक्रार त्यांनीच एप्रिल २०१३ मध्ये सरकारी यंत्रणेसमोर शपथेवर दिलेल्या साक्षीच्या नेमकी विरुद्ध आहे. जगताप यांना करारानुसार संपूर्ण रक्कम देण्यात आलेली आहे. कराराचा अवधी संपल्यानंतर सहा वर्षांपर्यंत जगताप यांनी कसल्याही प्रकारचा दावा-तक्रार दाखल केली नव्हती हे लक्षात घेता आताच्या तक्रारीमागे निव्वळ ‘यूएफओ मूव्हीज इंडिया लि.’ व कंपनीच्या प्रवर्तकांची बदनामी करण्याचा हेतू दिसतो. कंपनीच्या नियोजित ‘आयपीओ’वर विपरीत परिणाम व्हावा असाही त्यांचा प्रयत्न दिसतो, असे गायकवाड व हेटे यांनी स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर आम्ही कोणत्याही कागदपत्रांत फेरफार केलेला नाही. सर्व व्यवहार कायदेशीर व बँकेमार्फत केले आहेत. जगताप यांच्या तक्रारीचा हेतू लक्षात घेत आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणार आहोत. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकारी तपासयंत्रणांच्या निष्पक्षपाती चौकशीवरही आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही गायकवाड व हेटे यांनी नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:04 pm

Web Title: ufo movie has no relationship with transactions of land near panvel
Next Stories
1 ८० टक्के मेट्रो प्रकल्पग्रस्तांना दुप्पट जागा
2 मासे व्यापाऱ्यांचा आजपासून संप
3 ‘जागतिक चिमणी दिना’निमित्त व्याख्यान
Just Now!
X