अभिनेता सलमान खानचा व्हिसा अर्ज ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला. त्यामुळे सलमानच्या आगामी ‘किक’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर पडणार आहे. व्हिसा अर्ज नाकारण्याचे नेमके कारण देण्यात आलेले नाही.
‘किक’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान ग्लासगो इथे जाणार होता. त्यासाठी त्याने ब्रिटनकडे व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. २००२ मध्ये भरधाव गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी नुकताच सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आला. त्यामुळेच त्याचा व्हिसा अर्ज ब्रिटनने फेटाळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, ‘किक’चे निर्माते सलमानच्या व्हिसासाठी पुन्हा अर्ज करणार असल्याची माहिती मिळालीये.