शैक्षणिक व्हिसाचे १० पैकी ९ अर्ज मंजूर; सायबर सिक्युरिटी, फिनटेक अभ्यासक्रमांनाही भारतीयांकडून मागणी

बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, अभियांत्रिकी, संगणक विज्ञानाबरोबरच सायबर सिक्युरटी, फायनान्शियल टेक्नॉलॉजीसाठी (फिनटेक) फेलोशीप मिळवून पदव्युत्तर किंवा त्यात संशोधन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचाही इंग्लंडकडे ओढा वाढतो आहे. या अभ्यासक्रमांमधून केवळ दर्जेदार तंत्र आत्मसात करण्याचीच नव्हे तर इंग्लंडमधील नामांकित कंपन्यांमधून काम करण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळते. म्हणून आमच्या इतर अभ्यासक्रमांबरोबरच या फेलोशीपनाही सध्या भारतीय विद्यार्थ्यांकडून पसंती मिळत असल्याचे इंग्लंडचे डेप्युटी हेड ऑफ मिशन (पश्चिम भारत) पॉल कार्टर यांनी लोकसत्ताला सांगितले.

विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यंचे आव्हान आणि वित्त संस्थांना आपले ऑनलाईन व्यवहार अधिक सुलभ व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या तंत्राची गरज पाहता या क्षेत्रातील तज्ज्ञांना मागणी वाढते आहे. मात्र भारतात हे अभ्यासक्रम वा प्रशिक्षणाच्या संधी मर्यादित आहे. शिवाय त्याचा दर्जा पाहता अनेक कंपन्याच आपल्या अधिकाऱ्यांना परदेशात या विषयांमध्ये उच्चशिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत आहेत. परदेशी कंपन्याही यासाठी मुक्तहस्ते फेलोशीप देऊ  करतात. हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्यांची पहिली पसंती सध्याच्या घडीला इंग्लंडला मिळते आहे. इंग्लंडमध्ये पहिल्यापासूनच व्यवसाय आणि प्रशासन (बिझनेस अण्ड अडमिनिस्ट्रेशन), अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, सामाजिक शास्त्रे, जैवविज्ञान, विधी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. या पदवी—पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच सायबर सिक्युरटी, फायनान्शियल टेक्नॉलॉजी (फिनटेक) या विषयांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. अनेक कंपन्या त्यासाठी फेलोशीप देऊ करत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यानंतर इंग्लंडमध्ये कामाचा अनुभवही घेता येतो. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे कार्टर यांनी सूचित केले.

भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा मंजूर करण्याबाबतही आमचे धोरण उदार राहिले आहे. प्रत्येक १० भारतीय विद्यार्थ्यांपैकी ९ जणांचे व्हिसाचे अर्ज आम्ही मंजूर करतो, अशी माहिती त्यांनी पुरविली. व्हिसाविषयचे लवचिक धोरण आणि भारतात नीटमुळे (वैद्य्कीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा) आलेल्या मर्यादा यांमुळे सध्या भारतीय विद्यार्थ्यांचा चीनकडे वैद्य्कीय व अभियांत्रिकी शिक्षण घेण्याकडे कल वाढतो आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये १८,१७१ भारतीय विद्यार्थी शिकण्यास गेले. हा आकडा इंग्लंडला मागे टाकणारा आहे. याबाबत विचारले असता पॉल कार्टर म्हणाले, इंग्लंडमधील अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून चीन किंवा इतर कुठल्याही देशातील पासून आम्हाला भीती नाही. इंग्लंडने उच्चशिक्षणाबाबत गंभीर (जेन्युईन) असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागतच केले आहे आणि भविष्यातही करत राहील.

इंग्लंडमध्ये शिकण्याच्या संधीचे गाजर दाखवित विद्यार्थ्यांच्या माथी दर्जाहीन अभ्यासक्रम मारणाऱ्या संस्था परदेशातही आहेत. अशा संस्थांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहिले पाहिजे. म्हणून आम्हीही चांगल्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्राधान्य देतो आहोत. यामुळे विद्यार्थ्यांचीही भविष्यातील फसवणूक टळते.

पॉल कार्टर, इंग्लंडचे डेप्युटी हेड ऑफ मिशन (पश्चिम भारत)