रावेरमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी; प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये

उमेदवारींमध्ये घोळ घालणाऱ्या काँग्रेसमध्ये शनिवारी सकाळपासून मात्र वेगवान घडामोडी घडल्या. सांगली मतदारसंघ अखेर खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बहाल करण्यात आला असून, तिथून काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढवतील. रावेरमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्यांना पुण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

सांगली मतदारसंघ आपल्याकडे ठेवायचा की मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. पुण्यातील उमेदवारही ठरत नव्हता. याबाबत मुंबईत शनिवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली.

सांगली मतदारसंघ अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. आता काँग्रेसचे विशाल पाटील हे स्वाभिमानीचे उमेदवार आहेत. पालघरमध्ये भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेने उसनवारीवर घेऊन त्यांची त्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. सांगलीतही तसेच घडले आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांना स्वाभिमानीने उसनवारीवर घेऊन त्यांना मैदानात उतरवले आहे.

पुण्यातील उमेदवारही ठरत नव्हता. मुंबईत शनिवारी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, पुणे मतदारसंघाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केले नाही. लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल, असे संकेत मात्र मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने रावेर मतदारसंघ काँग्रेसला दिला. या मतदारसंघातून माजी खासदार उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचे अशोक चव्हाण यांनी जाहीर केले.