विकेण्डला मुंबईच्या तुलनेत उल्हासनगरमध्ये जास्त ध्वनी प्रदूषण होत असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने ध्वनी प्रदूषणासंबंधी २७ शहरांची पाहणी केली असून मुंबई आणि पुणे यादीत अव्वल स्थानी आहेत. याशिवाय उल्हासनगर, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवलीतही आवाजाची मर्यादा ओलांडली जात असून ८५ ते ९० डेसिबलपर्यंत आहे.

दिवसा आणि आठवड्याच्या दिवसांमध्ये उल्हासनगरमध्ये सर्वात जास्त ध्वनी प्रूदषण होत असून येथे ९१.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. सर्वात कमी ध्वनी प्रदूषण धुळ्यात होत असून तिथे ७२ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. रहिवाशी परिसरात आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल इतकी आहे.

ऑगस्ट २०१६ मध्ये उच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केंद्रीय संशोधन संस्था गठीत केली होती. या संस्थेने २७ शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी तपासली. मंगळवारी उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला.

अहवालात गाड्यांच्या हॉर्नमुळे सर्वात जास्त प्रदूषण होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अद्यापही विनाकारण हॉर्न न वाजवण्याच्या सुचनेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे असंही अहवालात सांगण्यात आलं आहे. अहवालात ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पर्यायही सुचवण्यात आले आहेत.

ध्वनी प्रदूषण तपासण्यासाठी सकाळी ६ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतची वेळ ठरवण्यात आली होती. ध्वनी प्रदूषणासाठी नवीन बांधकामही कारणीभूत ठरत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.