तिवरांची जंगले मातीच्या ढिगाऱ्यामुळे नामशेष
मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर तसेच आसपासच्या नगरांमधून दररोज निघणाऱ्या शेकडो टन डेब्रीजची विल्हेवाट लावण्यासाठी डेब्रीज माफियांची एक मोठी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली असून मुंबई-नाशिक महामार्गावर खारीगाव टोलनाक्यापासून माणकोलीपर्यत लांबलचक पसरलेल्या पट्टयात खाडीकिनारी असलेली तिवरांची विस्तीर्ण जंगले नष्ट करण्याचा धडाकाच या भागातील भूखंड माफियांच्या मदतीने लावला आहे. या खाडी परिसरात भूखंड माफियांकडून मातीचा भराव टाकून जमीन सपाट करण्याचे काम सर्व शासकीय यंत्रणांना वाकुल्या दाखवत अगदी बिनधोकपणे सुरू आहे. दिवसाढवळ्या डम्पर, जेसीबी मशीन आणि मजुरांचे ताफे या भागात दिसून येतात. यामुळे सागरी पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाणारी खारफुटीची जंगले नामशेष होऊ लागली असून बुजविलेल्या खाडीवर टपऱ्या,  वाहनतळ आणि अनधिकृत चाळी उभारण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. ठाण्यापलीकडे उभ्या राहात असलेल्या या ‘अनधिकृत बेटा’च्या भरणीसाठी एका डम्परमागे हजारो रुपयांचे कमिशन कमविण्याचा नवा धंदा माफियांनी सुरू केला आहे. दिवसभरात डेब्रीज घेऊन तिवरांच्या जंगलांवर रिते होणारे डम्परचे प्रमाण पाहाता लाखो रुपयांचा ‘कमीशन’चा धंदा या भागात दिवसाला होऊ लागला आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत भरणी होत असल्याने त्यास काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चाही उघडपणे होऊ लागली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारीगाव टोलनाका ते माणकोलीपर्यंत सुमारे पाच ते सहा किमी अंतराच्या मार्गावर दोन्ही बाजूस खाडी परिसर तसेच मोठय़ा जलवाहिन्या आहेत. साधारण महिनाभरापासून या भागात डेब्रीजने भरलेले ट्रक, डम्पर अशा वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. यामुळे या भागात राहणारे ग्रामस्थही चक्रावून गेले आहेत. तिवरांच्या जंगलांवर दहा ते बारा फूट उंचीपर्यंत  मातीचा भराव टाकून जेसीबीच्या साहाय्याने जमीन सपाट करण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या जलवाहिन्यांच्या मधोमध असलेल्या ओसाड जागेवरही मातीचा भराव टाकून सपाटीकरण सुरू आहे. भराव टाकण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे लावण्यात आले आहेत. भराव करण्यात आलेल्या जागेवर काही ठिकाणी अनधिकृतपणे टपऱ्या आणि वाहनतळ सुरू झाले असून त्याकडे जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मुंबई तसेच आसपासच्या परिसरात बांधकामातून निघणारे डेब्रीज कुठे टाकायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरी मुंबईतील काही डेब्रीज माफियांनी डेब्रीजची विल्हेवाट लावण्यासाठी नवी मुंबईचा रस्ता धरला होता. डेब्रीजने भरलेला एक ट्रक रिकामा करण्यासाठी सुमारे दोन ते तीन हजार रुपयांची आकारणी वाहतूकदार करतात. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील डेब्रीजचे ढिगारे उपसून माणकोली रस्त्यावर आणून टाकायचा धंदा सध्या तेजीत आला आहे. या ठिकाणी मातीची ने-आण करण्यासाठी डम्परची रीघ लागत असून अशाप्रकारे डम्पर उतरवून घेण्यासाठी स्थानिक माफियांनी कमिशन आकारणी सुरू केल्याची चर्चा आहे. खाडीवर भराव टाकून भूखंड गिळणारी एक मोठी टोळी या भागात तयार झाली असून डेब्रीजचे वाहतूकदार आणि भूमाफियांची नवी युती येथे तयार झाली आहे.  खाडी किनारी भराव टाकून त्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण पट्टयात वाढीस लागले आहे. ठाण्यापलिकडे अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या या बेटांवर अशाचप्रकारे अनधिकृत घरे उभारण्याचा डाव  भूमाफियांकडून आखला जात असल्याचे चित्र आहे.

महामार्गाचा विस्तार धोक्यात
मुंबई-नाशिक महामार्गावरील कापुरबावडी ते वडपापर्यंतच्या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हा रस्ता आठ पदरी करण्यात यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाच्या संबंधित विभागाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या संबंधीचा निर्णय केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या रस्त्याच्या दोन्ही बाजूस भूमाफियांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात, आठ पदरीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली, तरी याठिकाणचे अतिक्रमण या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोठा अडथळा ठरू शकतो,अशी भीती या विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.