लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिलमधील अनधिकृत बांधकामे आणि नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या कारभारावर पांघरुण घालणारी एक सर्वपक्षीय छुपी समांतर यंत्रणा निर्माण झाल्याचे उजेडात आले असून बडय़ा राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयांपासून आप्तस्वकीयांपर्यंत अनेकांचा त्यात सहभाग असल्याचे समजते. याबदल्यात राजकीय पक्षांतील काही स्थानिक नेत्यांच्या खिशात कमला मिलमधील हॉटेल, पब, रेस्तराँला चतुर्थश्रेणी कर्मचारी, बाऊन्सर, सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करण्याचे, तसेच सजावट, वाहनतळ आदी विविध छोटय़ा-मोठय़ा कामांची कंत्राटे टाकण्यात आली आहेत. एकूणच कमला मिल राजकारणी, पालिका अधिकाऱ्यांसाठी सोनाची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे.

घरघर लागलेल्या कमला मिलमध्ये स्वेच्छा निवृत्ती योजना लागू झाली आणि आपापले हिशेब घेऊन कामगार गिरणीतून कायमचे बाहेर पडले. त्यानंतर काही वर्षांमध्येच कमला मिलमध्ये नवे विश्व उभे राहिले. मूळ वास्तूमध्ये फेरफार करण्यात आले, तसेच नव्या वास्तू उभारण्यात आल्या. अनेक बडय़ा मंडळींनी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने तेथे आपली हॉटेल्स, पब, रेस्तराँ थाटली आणि कमला मिलचा परिसर रात्री-अपरात्री तरुणाईच्या थिरकण्याने गजबजून गेला. परिणामी कमला मिलच्या आसपासच्या रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ ओढवली. असे असतानाही या परिसरातील राजकारणी मंडळींनी स्थानिक रहिवाशांचे प्रश्न दूर सारुन कमला मिलला जवळ केले. अनेक बडय़ा नेत्यांची कमला मिलमधील हॉटेलमध्ये नित्यनियमाने उठबस होत असते. कमला मिलमधील साम्राज्याला धक्का बसू नये याची पूर्ण काळजी राजकीय वर्तुळाकडून घेण्यात येऊ लागली.

राजकीय पक्षाच्या बडय़ा नेत्यांच्या काही निकटवर्तीयांची रेस्तराँ, हुक्का पार्लर कमला मिलमध्ये असल्याचे समजते. त्यावर कसलीही आफत ओढवू नये म्हणून संबंधित राजकीय पक्षाच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांकडून विशेष काळजी घेण्यात येऊ लागली. कमला मिलमधील अनधिकृत बांधकामांना आशीर्वाद असलेल्या काही राजकीय मंडळींना थंडहवेच्या ठिकाणी, तसेच धार्मिक स्थळाजवळ निवासस्थानेही मिळाल्याचे समजते. इतकेच नव्हे तर मर्जीतील राजकीय नेत्यांना उत्सव काळात विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना, गोविंदा पथकांना सढळहस्ते मदत करता यावी यासाठी या मिलमधील व्यावसायिकांकडून निधीची रसदही पुरविण्यात येऊ लागली. या निधीतूनच आपल्या मतपेढय़ा जपण्याचे काम सर्वच पक्षाच्या राजकीय मंडळींकडून करण्यात येत होते. सरकारी यंत्रणांमध्ये वजन असलेल्या काही राजकारण्यांना दर महिन्याला मानधन दिले जात असल्याची जोरदार चर्चा या भागातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. कमला मिलमधील हॉटेल्समध्ये येणाऱ्या श्रीमंतांची वाहने उभी करण्यासाठी वाहनतळे निर्माण करण्यात आली आहेत. या वाहनतळांची कंत्राटे काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खिशात टाकण्यात आली असून त्यातील काही हिस्सा स्थानिक नेत्यांनाही मिळत असल्याची कुजबूज या परिसरात सुरू आहे.

कमला मिलमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची अथवा बेकायदा कारभाराची तक्रार एखाद्या पक्षाचा पदाधिकारी वा कार्यकर्त्यांकडून संबंधित यंत्रणांकडे केलीच, तर त्याबाबत मिटवामिटवी करण्याची जबाबदारी त्याच पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपविण्यात येते. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाच उभी करण्यात आली आहे. यावरुन सर्वच राजकीय पक्षांना कमला मिलने आपलेसे केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कमला मिल राजकीय वर्तुळासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.