18 October 2018

News Flash

पालिकेची तोड कारवाई सुरूच

दोन आठवडय़ांत ९१३ उपाहारगृहांवर कारवाई, ९० ठिकाणी टाळे

दोन आठवडय़ांत ९१३ उपाहारगृहांवर कारवाई, ९० ठिकाणी टाळे

कमला मिल दुर्घटनेला दोन आठवडे उलटले असून पालिकेने उपाहारगृहांवर पुन्हा एकदा जोरदार कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी शहरभरातील ३९७ उपाहारगृहांची तपासणी करीत ५२ ठिकाणी आढळलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्यात आली, तर २७१ उपाहारगृहांना तपासणी अहवाल देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी बजावण्यात आले. अग्निसुरक्षा नसलेल्या आणखी आठ ठिकाणांना टाळे ठोकण्यात आले आहे. यात अंधेरी ते वांद्रे दरम्यानची चार तसेच ‘बी’ आणि ‘जी’ विभागातील प्रत्येकी दोन उपाहारगृहांचा समावेश आहे. दोन आठवडय़ांत आतापर्यंत ९१३ उपाहारगृहांवर कारवाई करण्यात आली असून ९० ठिकाणी पूर्ण किंवा अंशत: भागाला टाळे ठोकण्यात आल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

कमला मिलमध्ये मोजोस बिस्त्रो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांमध्ये अग्निसुरक्षा धाब्यावर बसवली होती, तसेच अनधिकृत बांधकाम केले होते. २९ डिसेंबर रोजी या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्यावर जनभावनेचा उद्रेक लक्षात घेऊन महापालिकेने ३० डिसेंबरपासून शहरभरातील उपाहारगृहांवर कारवाई सुरू केली. ही कारवाई प्रामुख्याने अग्निसुरक्षेसंबंधी होती. १ जानेवारी रोजी महापालिकेने सर्व उपाहारगृहांना १५ दिवसांत अग्निसुरक्षा तसेच अनधिकृत बांधकामाबाबत स्वतच कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेने बुधवारपासून पुन्हा कारवाईला सुरुवात केली. बुधवार व गुरुवारी १३५ उपाहारगृहांमधील अनधिकृत बांधकाम  तोडण्यात आले, तर १५ उपाहारगृहांना टाळे ठोकले गेले. शुक्रवारी सकाळपासून सर्व २४ विभागांत कारवाईला सुरुवात झाली. त्यात ३९७ उपाहारगृहांची तपासणी झाली व ५२ ठिकाणी कारवाई झाली. ‘जी’ दक्षिण विभागातील फूड लिंक रेस्टॉरंट नावाची दोन उपाहारगृहे, ‘एच’ पश्चिम विभागातील सोशल, वॉण्टन, जाफरान व मार्क्‍स अ‍ॅण्ड स्पेन्सर्स तर बी विभागातील आजवा स्वीट व हादिया स्वीट अशा आठ ठिकाणांना टाळे ठोकण्यात आले आहे.

गेल्या दोन आठवडय़ांत २ हजार ५६८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून ९० उपाहारगृहांना टाळे ठोकण्यात आले. तर ९१३ उपाहारगृहांमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. याव्यतिरिक्त ७१८ आस्थापनांना तपासणी अहवाल देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच ३० डिसेंबर, २०१७ पासून १ हजार ४१० सिलिंडर जप्त करण्यात आले.

५२ चमू कामाला

शहरामधील उपाहारगृहांमधील अनियमिततांची तपासणी २४ विभागांमधील एकूण ५२ चमूंद्वारे सुरू आहे. या प्रत्येक चमूमध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते आणि इमारत व कारखाने खाते या तिन्ही खात्यांमधील प्रत्येकी एक अधिकारी व आवश्यकतेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

First Published on January 13, 2018 1:24 am

Web Title: unauthorized construction demolition by bmc