१०० वर्ष जुन्या खजुरिया तलावाचे बागेत रूपांतर भोवले

राजकीय दबावाखाली कांदिवली येथील १०० वर्षे जुन्या खजुरिया तलावात भराव टाकून त्याचे बेकायदेशीररीच्या बागेत रूपांतर करणे पालिकेला, तर पालिकेची कृती माहीत असतानाही तलावाचे बागेत रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणे राज्य सरकारला भोवले आहे. दोन्ही यंत्रणांच्या कृतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढत बागेचा तीन महिन्यात ताबा घेण्याचे आणि त्यावर करण्यात आलेले बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करून तलावाला गतवैभव मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्या शिवाय राजकीय दबावाखाली या तलावाचे पालिकेने बागेत रूपांतर केले होते. त्यानंतर बागेचे सुशोभिकरणही करण्यात आले होते. त्यासाठी पाच कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. पालिकेच्या बेकायदेशीर कृतीविरोधात पंकज कोटेचा या स्थानिकाने उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती.  न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने शुक्रवारी कोटेचा यांची याचिकेवर निकाल देताना पालिका प्रामुख्याने राज्य सरकारच्या कृतीवर ताशेरे ओढले. नैसर्गिक स्रोताचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.  या प्रकरणी सरकार  कर्तव्य निभावण्यात अपयशी ठरले आहे.  लोकांना तलावाचा आनंद घेण्यापासून वंचित राहावे लागले, असे ताशेरे ओढले आहेत.