दोन दिवसांत एक कोटी ४७ लाखांची तिकीटे जप्त; सर्वात मोठी कारवाई

सॉफ्टवेअरच्या साहाय्याने रेल्वेच्या ऑनलाइन तिकिटांचाही काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या मुसक्या आवळत रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांत तब्बल ६ हजार ६८३ ई-तिकिटे जप्त केली. मुंबईतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

सुट्टीकाळात रेल्वेचे लांब पल्ल्याची ‘कन्फर्म’ तिकिटे मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. अनेकांना तर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागतो. रेल्वेने ऑनलाइन तिकीट विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही सेंकदांतच प्रतीक्षा यादी समोर कशी येते, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडत असतो. मात्र यात दलालांचे जाळे कार्यरत असते. हे जाळे भेदण्याकरिता मध्य रेल्वे सुरक्षा दल, दक्षता पथक, आयआरसीटीसी आणि मुंबई विभागीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी ४७ लाख रुपयांची तिकिटे हस्तगत करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेने ओशिवरा, जोगेश्वरी पूर्व येथे एका दुकानावर २ मे रोजी कारवाई केली. त्या वेळी लॅपटॉप आणि अनधिकृत दलालांकडून वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १ लाख ४ हजार ४६५ रुपये किमतीची ८० ई-तिकिटे जप्त करण्यात आली. त्यानंतर ३ मे रोजी या सव्‍‌र्हरची रेल्वे पोलिसांच्या सायबरतज्ज्ञांकडून सखोल तपासणी केली असता आणखी ६ हजार ६०३ ई-तिकिटे सापडली. ही सर्व तिकिटे जप्त केली गेली आहेत. त्यांचे एकूण मूल्य पाहता १ कोटी ४७ लाख १४ हजार ८५० रुपये असल्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ई-तिकिटांवरील पीएनआर तात्काळ सील करण्यात आले. यासंदर्भात आणखी चौकशी सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

हे कसे होते?

  • अनधिकृतपणे तिकीट आरक्षण करणारे सॉफ्टवेअर बाजारात असून ज्या सॉफ्टवेअरचा वेग जास्त अशा सॉफ्टवेअरला तिकीट दलालांकडून मागणी अधिक. त्यामुळे तिकिटे ही अत्यंत वेगाने आणि झटपट काढली जातात.
  • इंटरनेटवर अधिक वेग असलेले सॉफ्टवेअर डाउनलोड करून त्यावरून आयआरसीटीसीची तिकिटे काढण्यात येतात.
  • सॉफ्टवेअर विकसित करणारे दलालही असून ते सॉफ्टवेअर महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपयांना भाडय़ावरही देतात.
  • पीआरएस तिकीट खिडक्या सुरू होताच रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करून काही सेंकदातच तिकिटे आरक्षित केली जातात.
  • काही वेळेला ई- तिकीट दलाल बोगस नावाने तिकीट आरक्षित करतात आणि त्याच नावाचे आधार कार्ड, पॅन कार्डही बनवतात आणि ते प्रवाशाला देतात. यात टीसी आल्यास प्रवासी पकडला जाण्याची शक्यताही अधिक.
  • यात अधिकृत दलालही असल्याचे निदर्शनास आले आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या एका विशेष आयडीवरून त्यांना आखून दिलेल्या आरक्षण क्षमतेनुसार जास्त तिकिटे काढतात आणि त्यांची विक्री करतात.
  • ई- तिकीट काढताना अधिकृत दलाल त्यांना दिलेल्या निर्धारित वेळेआधीच आपल्या पर्सनल आयडीवरूनही तिकीट काढतात.

सॉफ्टवेअरचा वापर.

जप्त करण्यात आलेल्या ई-तिकिटांसाठी अनधिकृत दलालांकडून जलद पद्धतीने तिकीट आरक्षित करणारे सॉफ्टवेअर वापरले जात होते. अशा प्रकारची अनेक सॉफ्टवेअर इंटरनेटवर सहज उपलब्ध होतात.