News Flash

धारावीतही बैठय़ा घरांवर अनधिकृत इमले

करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मुंबईमध्ये मार्च २०२० पासून टाळेबंदी जारी झाली आणि सर्व कारभार ठप्प झाला.

टाळेबंदीचा गैरफायदा घेत बांधकाम; पालिकेची कारवाई सुरू

मुंबई : टाळेबंदी आणि कडक निर्बंध लागू असताना वांद्रे येथील बेहरामपाडय़ापाठोपाठ आता धारावीतही बैठय़ा घरांवर इमले चढू लागले असून धारावीमधील सुमारे १५० बैठय़ा घरांवरील अनधिकृत मजले हेरून पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मुंबईमध्ये मार्च २०२० पासून टाळेबंदी जारी झाली आणि सर्व कारभार ठप्प झाला. सर्व सरकारी यंत्रणा करोनाविषयक कामांमध्ये व्यग्र झाल्या. ही संधी साधून अनेक झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली. एकटय़ा धारावीमध्ये बैठय़ा घरांवर दोन ते तीन मजले चढविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे १५० बैठय़ा घरांवर अनधिकृतपणे दोन-तीन मजले चढविण्यात आल्याचे पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ३० बैठय़ा घरांवरील अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात दुमजली आणि दुसऱ्या टप्प्यात तीन मजल्यांची बांधकामे तोडण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी पोलीस संरक्षणाची गरज भासत आहे. सध्या करोनामुळे ठेवण्यात आलेला बंदोबस्त, कोसळणारा पाऊस यामुळे पाडकामात अडथळा निर्माण होत आहे. मात्र असे असले तरी पोलीस बंदोबस्त मिळताच व्यापक प्रमाणावर पाडकाम हाती घेण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

तक्रारदाराला पालिकेचे दरवाजे बंद

धारावीतील अनधिकृत बांधकामांविरुद्ध लेखी तक्रार करून नंतर ती मागे घेणाऱ्या एका तथाकथित समाजसेवकाला पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाचे दरवाजे बंद केले आहेत. या तक्रारदाराने ३०० हून अधिक लेखी तक्रारी ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाकडे केल्या होत्या. काही दिवसांनी त्यापैकी काही तक्रारी त्याने मागे घेतल्याचे पत्रही दिले. या प्रकारामुळे संशय बळावला आणि पालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर या समाजसेवकाला पालिका कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:56 am

Web Title: unauthorized mansion sitting houses dharavi too ssh 93
Next Stories
1 गणेशमूर्ती साकारणाऱ्या परप्रांतीय कुशल कारागिरांना मुंबईचे वेध
2 मुंबईत १७९ ठिकाणी संरक्षक भिंतींची उभारणी
3 ‘मेट्रो-३’च्या भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण
Just Now!
X