वाहनचालकांकडून एक लाख ८० हजारांची दंडवसुली

मुंबई महापालिकेने रविवारी सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा उभ्या केलेल्या ६३ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात एक लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, दंड न भरल्याने ४७ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा नियम केला आहे. त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू करण्यात आली. रविवारच्या कारवाईत ३७ मोटारगाडय़ा, नऊ दुचाकी, तीन तीनचाकी आणि एका टेम्पोचा समावेश आहे.

वाहनांची वाढती संख्या, बेशिस्त उभी केलेली वाहने आणि त्यामुळे वाहतूक तसेच पादचाऱ्यांना होणारा अडथळा या बाबी लक्षात घेत पालिकेने अशा वाहनांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला. सार्वजनिक वाहनतळांलगतच्या रस्त्यावर एक कि.मी.वर, तसेच दोन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या लहान गल्ल्यांमध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांना एक हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. अशा वाहनांवर ७ जुलैपासून कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. तसेच पालिकेतील सर्वपक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली. वाहनतळांलगतच्या रस्त्यावर एक कि.मी.ऐवजी ५०० मीटर क्षेत्रात उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी शिफारस करीत सर्वपक्षीय गटनेत्यांनी या कारवाईला हिरवा कंदील दाखविला.

  • नव्या धोरणाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी परळ आणि परिसरातील वाहनतळांमध्ये २५५पेक्षा अधिक वाहने उभी करण्यात आली.
  • अनेकदा यापैकी काही वाहने वाहनतळालगतच्या रस्त्यांवर उभी करण्यात येत होती. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता.
  • ही वाहने वाहनतळांमध्ये उभी केल्यामुळे वाहतूक कोडींचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांना आहे.