26 February 2021

News Flash

जे.जे. रुग्णालयातील खासगी प्रयोगशाळांच्या घुसखोरीला अखेर चाप

रुग्णालयाबाहेर चाचण्या करण्यासाठी प्रशासनाची परवानगी बंधनकारक

|| शैलजा तिवले

रुग्णालयाबाहेर चाचण्या करण्यासाठी प्रशासनाची परवानगी बंधनकारक

जे.जे. रुग्णालयातील खासगी प्रयोगशाळांच्या घुसखोरीला अखेर चाप बसला आहे. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या कोणत्याही चाचण्या बाहेरील खासगी प्रयोगशाळांमधून करून घेण्यास रुग्णालय प्रशासनाने मनाई केली आहे. काही कारणास्तव चाचण्या बाहेर करण्याची आवश्यकता भासलीच तर रुग्णालय प्रशासनाची परवानगी घेणे यापुढे बंधनकारक असणार आहे.

डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आदी चाचण्या जे.जे. रुग्णालयामध्ये उपलब्ध असूनही रक्ताचे नमुने थेट खासगी प्रयोगशाळांकडे चाचणीसाठी पाठविले जातात. याचा आर्थिक  फटका रुग्णांना बसत असल्याचे वृत्त ‘जे.जे. रुग्णालयात खासगी प्रयोगशाळांची घुसखोरी’ या शीर्षकाखाली १ ऑक्टोबर २०१८ च्या ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी रुग्णालयातील सर्व विभागांना वरील आदेश दिले आहेत.

रुग्णालयातील सर्व विभागाच्या प्रमुखांची नुकतीच बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये खासगी प्रयोगशाळांच्या घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनांची आखणी करण्यात आली. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या चाचण्या बाहेर करण्यासाठी पाठवून रुग्णांची लुबाडणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. काही आपत्कालीन स्थितीमध्ये बाहेरच्या प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्याची आवश्यकता भासल्यास निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची परवानगी घेणे बंधनकारक असेल. या व्यतिरिक्त रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या चाचण्या बाहेरून करण्याची गरज भासल्यास वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिष्ठाता यांची परवानगी घ्यावी लागेल, अशी माहिती डॉ. मुकुंद तायडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

खासगी प्रयोगशाळांच्या घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षारक्षकांना यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारे खासगी प्रयोगशाळांचे कर्मचारी रुग्णालय आवारात आढळून आल्यास पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याचेही डॉ. तायडे म्हणाले.

रुग्णालयातून रक्ताचे नमुने खासगी प्रयोगशाळांमध्ये पाठविणाऱ्या काही डॉक्टरांना याचा मोबदला मिळत असल्याची चर्चा आहे. या अवैध कट प्रॅक्टिसला चाप लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घेतल्याने काही प्रमाणात लगाम बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या माध्यमातून होणारी रुग्णांची लुबाडणूक थांबवली जाईल, असा विश्वास रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 12:47 am

Web Title: unauthorized tests in jj hospital
Next Stories
1 ‘झोपु’तील ‘टीडीआर’च्या मुक्त वापरावर अंकुश
2 लोकसभा लढण्याबाबत नेतेमंडळी सावध
3 युतीबाबत सेना नेत्यांमध्ये संभ्रम
Just Now!
X